वीज पडण्याच्या घटना वाढल्या : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा सल्लालोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील काही दिवसांपासून वज्राघाताचे (वीज पडण्याचे) प्रमाण वाढत चालले आहे. वज्राघातापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाची शेती केली जाते. धानाची रोवणी व इतर मशागतीची कामे पावसाळ्यातच करावी लागतात. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान बहुतांश नागरिक दिवसभर शेतात सकाळपासून राबतात. परिणामी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक जास्त प्रमाणात वीज पडण्याच्या घटनेचे शिकार बनत चालल्याचे दिसून येत आहे. विजा कडकडण्यास सुरुवात झाल्यानंतर लगेच शेताजवळील एखादे घर असल्यास घराचा आसरा घ्यावा, पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर यावे, झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे, ओल्या शेतात रोप लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे, शेतात काम करीत असाल तर सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला नसेल तर शक्यतो जेथे आहात तेथेच राहावे, शक्य असले तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाठ अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवावा, दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात टेकवून डोके जमिनीकडे झुकवा तथा डोके जमिनीवर ठेवू नका, धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून दूर राहा, गाव, शेत, आवार, बाग बगिचा आणि घराच्या सभोवती तारेचे कुंपन घालू नका, कारण ते विजेला ते सहजतेने आकर्षित करते. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करू नका, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका, झाडाखाली उभे राहू नका, उंच जागेवर झाडावर चडू नका, वीज वाहक वस्तू जसे रेडिएटर, मेटल, लोखंडी पाईप, विद्युत उपकरणे बंद ठेवा, पाण्याचे नळ, फ्रीज, टोलिफोन यांना स्पर्श करू नका किंवा त्यापासून दूर राहा, विजेवर चालणाऱ्या यंत्रांपासूनही दूर राहा, कपडे वाळविण्यासाठी सुतळी किंवा दोरीचा वापर करा, मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपापल्या घरी वीज अटकाव यंत्रणा बसवावी, टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टॉवर यापासून दूर राहा, आपले घर, शेत इत्यादींच्या आसपास कमी उंचीची फळझाडे लावा, प्लग जोडलेले विद्युत उपकरणे हाताळू नका, दुरध्वनीचा वापर करू नका, दुचाकी वाहने, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशा वेळी वाहनातून प्रवास करु नका. उंच वृक्षाच्या खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे, म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनातच राहावे. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास, धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नका. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्या. वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा, अशा प्रकारे सावधानता बाळगल्यास जिवीत हानी होणार नाही.बाहेर असल्यास मोकळ्या जागेत थांबामोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घेणे चांगले. मोकळ्या आकाशखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा. एकाच वेळ जास्त व्यक्ती एकत्र राहू नका, दोन व्यक्तीमधील अंतर किमान १५ फूट असेल असे राहा. पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी तत्काळ पाण्यातून बाहेर यावे.ग्रामीण व दुर्गम भागातील बहुतांश नागरिकांना अजूनही वीज पडण्याच्या घटनेपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे, याची माहिती नाही. त्यामुळे प्रशासनातील स्थानिक अधिकारी, शाळा, महाविद्यालये, लोकप्रतिनिधी, स्वसेवी संस्था यांनी विविध माध्यमातून जनजागृती करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
वज्राघातापासून सावध राहा
By admin | Published: June 20, 2017 12:47 AM