गडचिरोली : न्यायालयात झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर महिलेने मैत्रिणीच्या आजीच्या घरातून दागिने पळवले. या प्रकरणात येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर.आर.खामतकर यांनी महिलेस दोषी ठरवून सात वर्षांचा कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा १६ ऑगस्ट रोजी सुनावली.
यशोदा ऊर्फ नंदिनी नाजुकराव उसेंडी(रा. काकडयेली ता. धानोरा) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. ताराबाई महादेव पेंदाम (रा.साखरा ता.गडचिरोली) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या नातीचे न्यायालयात पतीविरुद्ध फारकतीचे प्रकरण सुरु होते. यासाठी तिचे न्यायालयात सतत येणे- जाणे असायचे. यशोदा उसेंडी ही देखील न्यायालयात फारकतीच्या प्रकरणासाठी येत असे.
या दोघींची न्यायालयात ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यामुळे यशोदाचे ताराबाई यांच्या नातीसोबत घरी येणे- जाणे सुरु झाले. २५ मार्च २०२३ रोजी यशोदा उसेंडीने ताराबाई यांच्या घरातील टिनाच्या पेटीतील दागिने व रोख रक्कम असा सुमारे ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. यासंदर्भात ताराबाई पेंदाम यांनी गडचिरोली ठाण्यात यशोदा उसेंडीविरोधात फिर्याद दिली. हवालदार गंगाधर जुवारे यांनी पो.नि. अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
युक्तवाद ग्राह्य धरुन सुनावली शिक्षा
विशेष सहायक सरकारी अभियोक्ता बी.के.खोब्रागडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आज १६ ऑगस्ट रोजी प्रथमश्रेणी न्या. आर. आर. खामतकर यांनी यशोदा उसेंडी हिस दोषी ठरवले. विविध कलमान्वये तिला एकूण सात वर्षांचा सश्रम कारवास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ॲड. बी. के. खोब्रागडे यांना कोर्ट पैरवी हवालदार दिनकर मेश्राम, श्रीराम करकाडे, हेमराज बोधनकर, व सोनिया दुर्गे यांनी सहकार्य केले. त्यामुळे आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविणे सुकर झाले.