गडचिराेली : पोलिस भरतीसाठी आलेला तरुण विवाहित तरुणीच्या प्रेमात पडला, त्यानंतर दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र, त्यांच्यात बिनसले व फोनवरून कडाक्याचे भांडण झाले. अखेर रागाच्या भरात प्रेयसीने किरायाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याचे कळाल्यावर हादरलेल्या प्रियकरानेही विष प्राशन केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातील फुले वॉर्डात ९ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली.
सुवर्णा ऋषी काेटेवार (२५, रा. चक बल्लारपूर, जि. चंद्रपूर) असे गळफास घेतलेल्या प्रेयसीचे नाव आहे. चेतन माेरेश्वर बावणे (२०, रा. मुधाेली चक, रा. चामाेर्शी) असे विष प्राशन करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. सुवर्णा काेटेवार हिचे माहेर पाेंभुर्णा तालुक्यातील बल्लारपूर चक येथील आहे. तिचे आठ वर्षांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील पाथरी परिसरातील तरुणाशी लग्न झाले होते. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. ती पतीपासून वेगळी राहत हाेती. मुलगा पतीकडेच राहताे. ती कुठे राहते हे तिच्या वडिलांनाही माहीत नव्हते. ती गडचिराेली येथे सहा महिन्यांपूर्वी आली होती.
एका दुकानामध्ये काही दिवस काम केले. फुले वाॅर्डातील खोली भाड्याने घेऊन ती राहत होती. दरम्यान, चेतन हा पाेलिस भरतीची तयारी करण्यासाठी गडचिराेलीत आला हाेता. त्याची ओळख सुवर्णासाेबत झाली. मागील दाेन महिन्यांपासून ते दाेघेही एकाच खाेलीमध्ये राहत हाेते. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. चेतन हा गावाकडे गेला हाेता. त्याच्या गावी जाण्यास सुवर्णाचा विरोध होता. यावरून दोघांत कडाक्याचा वाद झाला. यानंतरही दोघांमध्ये फोनवरून वादावादी झाली.
घटनेची माहिती सुवर्णाचे वडील गजानन राजन्ना गज्जलवार (रा. चक बल्लारपूर) यांना देण्यात आली. ते गडचिराेली येथे पाेहाेचले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. गज्जलवार यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद असून तपास ठाणेदार अरुण फेगडे करीत आहेत.
चेतनची मृत्यूशी झुंज सुरू
सुवर्णाने शुक्रवारी दुपारनंतर गळफास घेतला. उशीर हाेऊनही सुवर्णा खाेलीच्या बाहेर न पडल्याने बाजूच्या भाडेकरूंना संशय आला. त्यांनी डाेकावून बघितले असता, ती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. शनिवारी मध्यरात्री याबाबतची माहिती गडचिराेली पाेलिसांना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी चेतनला संपर्क केल्यावर भीतीपोटी त्याने आपल्या गावी रात्रीच कीटकनाशक प्राशन केले. त्याला गंभीर अवस्थेत चामाेर्शी ग्रामीण रुग्णालय व नंतर जिल्हा रुग्णालयात भरती केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.