१०३ ग्रामसभांचा सहभाग : २० वर्षांच्या प्रात्यक्षिक व अनुभवानंतर तंत्राचा वापर गडचिरोली : तेंदूपत्ता चांगला यावा यासाठी आजपर्यंत जंगलांना आगी लावल्या जात होत्या किंवा खुटकटाई (तेंदूचे लहान झाड तोडणे) केली जात होती. मात्र धानोरा तालुक्यातील ग्रामसभांनी बेलकटाई हे नवीन तंत्र शोधून काढले आहे. या तंत्रामध्ये तेंदूच्या झाडाची जुनी पाने तोडली जातात. यामुळे नवीन चांगली पालवी येण्यास मदत होते व झाडही कायम राहून त्याची वाढ होण्यास मदत होते. या नवीन तंत्राच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. धानोरा तालुक्यातील १०३ ग्रामसभांनी एकत्र येत तेंदूपत्त्याचा लिलाव केला. या ग्रामसभांना शासनाच्या तुलनेत सुमारे चार पट दर उपलब्ध झाला आहे. लिलावानंतर कंत्राटदाराने ३० टक्के अनामत रक्कम ग्रामसभेच्या खात्यात जमा केली आहे. प्रत्येक ग्रामसभेच्या खात्यात जवळपास तीन ते चार लाख रूपयांची रक्कम जमा झाली आहे. या निधीचा उपयोग वन व्यवस्थापन व संरक्षणासाठी करण्याचा निर्णय ग्रामसभांनी घेतला. जंगलांना आगी लावल्यास किंवा तेंदूचे लहान झाड तोडल्यास चांगल्या दर्जाचा नवीन तेंदूपत्ता येतो, असा गैरसमज कंत्राटदारामध्ये असल्यामुळे मार्च महिना सुरू होताच जाणूनबुजून जंगलाला आगी लावल्या जात होत्या. यामध्ये कोट्यवधी रूपयांचे वनसंपदा नष्ट होत होती. वनवे थांबविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने फायरलाईन जाळल्या जात होत्या. आग विझविणारी यंत्र खरेदी केली जात होती. यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च होऊनही जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढतच चालले होते. खुटकटाईच्या माध्यमातून तेंदूचे झाड अगदी बुडापासूनच तोडले जात असल्याने सदर झाडाची वाढ खुंटत होती व दरवर्षीच जिवंत राहण्याचा प्रश्न झाडासमोर निर्माण होत होता. चार ते पाच वर्षानंतर ते झाड पूर्णपणे नष्ट होत होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन माजी आमदार हिरामन वरखडे यांनी व नागरिकांनी बेलकटाई हे नवीन तंत्र शोधून काढले. कंत्राटदाराकडून अनामत म्हणून मिळालेली ३० टक्के रक्कम यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. बेल कटाईच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींना सात दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. १०३ गावात १० हजार पेक्षा अधिक मनुष्यदिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. सदर उपक्रम इतर ग्रामसभांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यामुळे वन विभागाने या पध्दतीचा प्रचार करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी) अशी केली जाते बेलकटाई सतत २० वर्षांच्या अनुभव व प्रात्यक्षिकानंतर ही पध्दत शोधण्यात आली आहे. याबाबतचे प्रशिक्षण वैद्यराज सुखदेव गावळे व गावातील मजुरांना दिले जात आहे. बेलकटाईमध्ये तेंदूच्या लहान झाडाची जुनी पाने तोडली जातात. त्यामुळे त्या झाडाला नवीन पालवी येण्यास सुरूवात होते. खुटकटाईच्या तुलनेत ही पध्दत थोडी किचकट असली तरी या पध्दतीत झाड नष्ट होत नाही. त्यामुळे या माध्यमातून जंगलाचे संरक्षण होण्यास मदत होते. बेलकटाईमुळे तीनपट तेंदूपत्ता वाढीची खात्री आहे. बेलकटाईचा १०३ गावांनी नियोजन आराखडा तयार केला आहे. मोहफूल वेचण्यासाठी आगी लावू नये, असे आवाहनही केले जात आहे. त्याचबरोबर मोकळ्या जागेत बांबूची लागवड करण्यासाठी या ग्रामसभा प्राधान्य देणार आहेत.
तेंदू वाढीसाठी बेलकटाईचे तंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2017 1:25 AM