आॅनलाईन लोकमतअहेरी : शासनाच्या योजनांमधून गरीब व गरजू कुटुंबांना घरकूल व शौचालयाचा लाभ दिला जातो. मात्र या योजनेच्या अनुदानाची मर्यादा असल्याने विहित अनुदानात घरकूल व शौचालयाचे बांधकाम करणे लाभार्थ्यांना कठीण झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रेतीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत ३ हजार ५०० ते ४ हजार तसेच प्रसंगी प्रती ब्रास रेतीला ४ हजार ५०० रूपये लाभार्थ्यांना मोजावे लागत आहे. रेती व विटा खरेदीत अनुदानाची ८० टक्के रक्कम खर्च होत असल्याने शासकीय योजनेतून मिळालेले घरकूल व शौचालयाचे काम कसे करावे, या विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत.त्यामुळे घरकूल व शौचालयाच्या कामासाठी कमी दरात रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी महागाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय अलोणे यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी अहेरीचे नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग यांना निवेदन दिले. यावेळी महागाव येथील ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.यंदा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतलगतच्या रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला. मात्र यंदा रेतीचे दर प्रचंड वाढले आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात रेती प्रती ब्रास ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये दराने विकली जात आहे. घरकूल व शौचालय बांधकामासाठी १५ ते २० ब्रास रेतीची गरज भासते. विटांचेही भाव प्रचंड वाढले आहेत. घरकूल व शौचालयाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या विटा व रेती खरेदीसाठी ८० ते ९० हजार रूपये लाभार्थ्यांना खर्च करावे लागत आहेत. लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान १ लाख ३० हजार व शौचालयाचे अनुदान १२ हजार रूपये मिळत आहेत. एकूण १ लाख ४२ हजार मधून ९० हजार रूपये रेती, विटा खरेदीवर खर्च होत आहेत. उर्वरित ५२ हजार रूपयात घरकूल व शौचालयाचे बांधकाम काम कसे करावे, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. यावर प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.
रेतीचे दर वधारल्याने लाभार्थी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:43 PM
शासनाच्या योजनांमधून गरीब व गरजू कुटुंबांना घरकूल व शौचालयाचा लाभ दिला जातो.
ठळक मुद्देकमी दरात रेती उपलब्ध करा : घरकूल व शौचालय योजनेच्या कामावर परिणाम