पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी १५ जुलै ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. याबाबत सुरू करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसूचित खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के, नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे.
प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करताना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्यासह अग्रणी जिल्हा प्रबंधक युवराज टेंभुर्णे, उपविभागीय कृषी अधिकारी भाऊसाहेब कदम, गुण नियंत्रण अधिकारी संजय मेश्राम, तंत्र अधिकारी शीतल खोबरागडे, मंडळ कृषी अधिकारी चलकलवार उपस्थित होते.
(बॉक्स)
विमा संरक्षित रक्कम, हप्ता व पिकाचे नाव
तांदूळ (भात) पिकासाठी- विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर ३१,२५० रुपये व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर ६२५ रुपये इतका आहे.
सोयाबीन पिकासाठी- विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर ३४५०० रुपये असून, शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर ६९० रुपये इतका आहे
कापूस पिकासाठी - विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर रुपये ३५७५० रुपये असून, शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर १७८७.५० रुपये इतका आहे.
(बॉक्स)
केव्हा मिळू शकतो विम्याचा लाभ?
हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी किंवा लावणी न होणे, पिकांच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, यामध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूसंखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींचा समावेश आहे, तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीपश्चात होणारे पिकांचे नुकसान याचाही यात समावेश असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले.