लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत निराधार योजनेची ५९ प्रकरणे मंजूर करण्यात आली. ज्यांचे प्रकरण मंजूर झाले आहे. त्यांना मासिक दीड हजार रूपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
निराधार, वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त तसेच निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके, इत्यादींचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना विहीत योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसाहाय्य देण्यात येते. त्याअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति महिना १ हजार ५०० रूपये अनुदान वाटप करण्यात येते.
आरमोरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा तहसील कार्यालयाच्या सभागृहात, समितीचे अध्यक्ष नंदू पेट्टेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला तिजेंद्र गरमडे, प्रेमिता महेंद्र सने, महेश बुल्ले, दीपक निंबेकर, तहसीलदार उषा चौधरी, गटविकास अधिकारी मंगेश, नायब तहसीलदार डी. एम. वाकुलकर, अव्वल कारकून ए. एम. नन्नावरे, महसूल सहायक जे. पी. गुरनुले, आरेवार उपस्थित होते.
बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची २३ प्रकरणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेची २२, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेची ९, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेची ५, अशी एकूण ५९ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. त्यांना मदत मिळेल.
मानधन वाढीची अपेक्षा म्हातारपणात कोणतेही काम करणे शक्य होत नाही. मात्र वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. औषध गोळ्यांवर बराच पैसा खर्च होते. शासन केवळ दीड हजार रूपये देते. ते पुरेसे नाहीत, त्यात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.
निराधारांनो, व्यवस्थित अर्ज करा अनेक नागरिक योजनेसाठी पात्र राहतात. मात्र ते व्यवस्थित अर्ज करीत नाही. आवश्यक कागदपत्रे नसल्याने अर्ज प्रलंबित ठेवला जातो. दुसरी सभा होईपर्यंत त्याला आर्थिक सहाय्य मिळत नाही. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावित असे आवाहन करण्यात आले आहे.