तयारी पूर्ण : राज्यपालांसह नितीन गडकरी व अनेक मंत्री गडचिरोलीत येणार गडचिरोली : तेलंगणा-महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या ३५० कोटी रूपये खर्च करून उभारलेल्या गोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पण करून प्राणहिता व इंद्रावती नदीवरील पुलाचे भूमिपूजन करण्यासाठी राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३० डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम आदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने जिल्हाभर सुरक्षा व्यवस्था टाईट केली आहे. गडचिरोली शहरातही शेकडो पोलीस या सुरक्षा यंत्रणेच्या कामात तैनात करण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने मंत्री दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षेच्या सर्व खबरदारी घेण्यात येत आहेत. सुरूवातीला राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री हेलिकॉप्टरने सिरोंचा येथे जाणार आहेत व तेथून लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर गडचिरोली येथे येतील. सिरोंचाच्या कार्यक्रमाला तेलंगणा राज्यातूनही नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गडचिरोलीत हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर पोलीस मुख्यालयापासून शिवाजी महाविद्यालयापर्यंत ते वाहनाने येणार आहेत. यासाठी संपूर्ण परिसरातील रस्ते नवीन व चकचकीत करण्यात आले आहेत. शिवाजी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराला कडेकोट सुरक्षेचा पहारा लावण्यात आला आहे. धानोरा-चंद्रपूर मार्गावरही शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गुरूवारी दुपारी पोलिसांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या वाहनाच्या ताफ्याची रंगीत तालीमही पार पाडली. या ताफ्यामध्ये जवळजवळ १५ च्या वर वाहने होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सभास्थळावर ठिय्या मांडून असून संपूर्ण सभास्थळाचा सुरक्षा यंत्रणांनी ताबा घेतला आहे. सायंकाळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांनी सभा स्थळाला भेट देऊन येथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते. १५ हजारांवर लोक उपस्थित राहण्याची शक्यता शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी १ वाजता राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री व राज्यपाल, इतर सर्व मान्यवर मंत्री गडचिरोली ते छत्तीसगड (सीमेपर्यंत), गडचिरोली ते मूल, गडचिरोली ते सिरोंचा, गडचिरोली ते आरमोरी-ब्रह्मपुरी-नागभिड, आलापल्ली-भामरागड-नारायणपूर (छत्तीसगड), गडचिरोली-वडसा-साकोली, ब्रह्मपुरी-वडसा-कुरखेडा-कोरची-देवरी-आमगाव ते गोंदिया या महामार्गांचे भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर जाहीर सभेला ते मार्गदर्शन करतील. या सभेला १५ हजारांवर अधिक नागरिक उपस्थित राहतील, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. गडकरींचे योगदान मोठे मागील १४ वर्षांपासून सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ चे काम रखडलेले होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नामदार नितीन गडकरी यांनी या कामाला प्राधान्य देऊन या कामाचा मार्ग मोकळा केला. खासदार अशोक नेते यांच्या पाठपुराव्यानंतर गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघातून या सात राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी दिली. त्यामुळे या महामार्गाचे काम मार्गी लागू शकले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेले वचन यानिमित्ताने पूर्ण होत असल्याची भावना जिल्हावासीयांच्या मनात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी चोख सुरक्षा
By admin | Published: December 30, 2016 1:47 AM