गडचिरोली : गडचिराेली- चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस पाच किमी अंतरावर चिचडोह बॅरेज आहे. सात महिन्यांपूर्वी बॅरेजचे दरवाजे बंद केले हाेते. तेव्हापासून येथे भरपूर पाणीसाठा आहे. यंदा १ जूनपासून पावसाळा सुरू हाेणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने पुढील धाेका ओळखून पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ दरवाजे १ जून राेजी उघडले जाणार आहेत. याबाबत बॅरेजखालील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा चंद्रपूरच्या लघु पाटबंधारे विभागाने दिला.
चिचडाेह बॅरेजचे सर्व दरवाजे १५ ऑक्टोबर २०२२ राेजी बंद करण्यात आले होते. यावर्षी १ जूनपासून पावसाळा सुरू हाेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लवकर पावसाळा सुरू झाल्यास पूर परिस्थिती निर्माण हाेईल. हा धाेका ओळखून बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व ३८ दरवाजे १ जून राेजी उघडण्याचे नियोजन आहे. पाणी साेडल्यास बॅरेजच्या निम्न भागातील नदीतील पाण्याची पातळी वाढेल. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहावे, यासाठी लघु पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला. विशेष म्हणजे, बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले. मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस चार किमीवर बॅरेज आहे. बॅरेजची एकूण लांबी ६९१ मीटर असून १५ मीटर लांब बाय नऊ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविले आहेत. खासदारांनी केली चिचडाेह बॅरेजची पाहणी.
नागरिकांनी काय करू नये?
बॅरेजमधून पाणी साेडल्यानंतर पाणी पातळी वाढेल. परिणामी, जीवित व वित्तहानी होऊ शकते. ही हानी हाेऊ नये, यासाठी पाणी साेडण्याच्या कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील शेतीत कामे करताना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थानात येणाऱ्या यात्रेकरूंनी नदीवर आंघोळ करताना खबरदारी घ्यावी, मासेमार, नदीघाटातून वाळू काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी कळविले.
गडचिराेलीतील २१ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १७ गावे
गडचिराेली जिल्ह्यातील एकूण २१ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १७ गावे वैनगंगा नदीच्या चिचडाेह बॅरेजच्या बाधित क्षेत्रात येतात. यामध्ये गडचिराेली तालुक्यातील डाेंगरगावसह अन्य तीन अशी चार गावे, तर चामाेर्शी तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीकाठावरील दुसऱ्या बाजूच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील एकूण १७ गावांचा बाधित क्षेत्रात समावेश आहे.
दिना धरणात पाणीसाठा किती?
चामाेर्शी तालुक्यातील रेगडी येथे असलेल्या दिना धरणात सध्या ३७ टक्के पाणीसाठा आहे. जनावरांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सहा दिवसांपूर्वी धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग साेडण्यात आला. विशेष म्हणजे, आरमाेरी तालुक्यात असलेल्या काेसरी लघु प्रकल्पाचे कामसुद्धा अद्याप पूर्ण झाले नाही. सध्या ७५ टक्केच काम झाले आहे.
शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार नेते यांची माहिती
चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज, गडचिरोली येथील कोटगल बॅरेज प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रकल्पग्रस्त घोषित करण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक बोलावण्यात येईल, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. चिचडोह बॅरेज प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
चिचडोह बॅरेज प्रकल्पामध्ये आतापर्यंत एकूण ४३४.५१ हे. आर. पैकी ३४०.८८ हे. आर. जमीन संपादित झालेली आहे. उर्वरित शेतजमीन भूसंपादन करण्यासाठी सिंचन विभागाने राज्य शासनाकडे ६० कोटींची मागणी केली आहे. सदर मागणी लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा खा. अशोक नेते यांनी व्यक्त केली आहे. चिचडोह बॅरेजसाठी काही शेतजमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित असल्याने या विषयावरील पाठपुराव्याने मंत्रालय मुंबई येथे सोमवारी बैठक बोलावण्यात आली. अनेक शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत प्रकल्पाने जमिनीचे भूसंपादन केल्यानंतरही मोबदला दिला नाही. त्यामुळे राज्य सरकारने सदर ६० कोटी रुपये मंजूर केल्यास भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यास अडचण येणार नाही, अशी माहिती खा. नेते यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी भाजप एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, कान्होजी लोहोंबरे, सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.