अहेरी : माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी बुधवारी अहेरी येथील एकलव्य वसतिगृहातील काेराेना केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, त्यांनी रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांशीही संवाद साधला.
अहेरी उपविभागातही काेराेना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. बऱ्याच रुग्णांवर काेविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. परंतु रुग्णांना याेग्य साेयी-सुविधा पुरविल्या जात आहेत की नाही तसेच त्यांच्यावर याेग्य उपचार केला जात आहे की नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी जि. प. सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी एकलव्य वसतिगृहातील काेराेना केंद्राला भेट दिली. रुग्णांनी परिस्थितीला न घाबरता हिमतीने राेगाचा मुकाबला करावा व त्यावर मात करावी, काेराेना रुग्णांसाठी नावीण्यपूर्ण व आवश्यक साेयी-सुविधा पुरविण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे भाग्यश्री आत्राम यांनी सांगितले. याप्रसंगी राकाॅं तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगाेनवार, मखमूर शेख, सुमित माेतकुलवार उपस्थित हाेते.