‘भारत प्रेस’ पाठोपाठ बब्बूभाई पटेल यांनी १९६५ ला महाराष्ट्र प्रेस सुरू झाल्याने झाडीपट्टी आणि बाहेरील नागपूर, पुणे येथील महिला कलाकार उपलब्ध केले जाऊ लागले व महिला पात्र स्त्रीच साकारू लागल्या. हौशी कलावंत आणि हौशी नाटक १९६० नंतर आताही सादर होत आहेत; परंतु व्यावसायिक नाट्य कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने हौशी रंगभूमी मागे पडून व्यावसायिक रंगभूमी वरच्या पायदानावर आली आहे.झाडीपट्टीतील समाजाने शेकडो वर्षांपूर्वीपासून जपलेल्या संगीतमय नाट्यकलाकृतीच्या सादरीकरणाला झाडीपट्टी रंगभूमी असे नामाभिधान प्राप्त झाले. जे आजही तेवढ्याच गोडीने येथील नाट्यरसिक मनसोक्त आस्वाद घेतात. झाडीपट्टी रंगभूमीच्या आरंभापासून ते आजच्या रंगभूमीच्या सोनेरी कारकिर्दीपर्यंत अविभाज्य घटक राहिलेली वडसा (देसाईगंज) ही नगरी आज झाडीपट्टी रंगभूमीची राजधानी झाली आहे. महिनाभरापूर्वीपासून झाडीवूड देसाईगंज शहर नाटकांच्या होर्डिंग्जने सजू लागले आहे. नाट्यवेड्यांनी नाटक बुक करण्यासाठी गर्दी केली आहे.दिवाळी ते होळी यादरम्यान झाडीपट्टीत नाटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. नाटक म्हटले की येथील रसिक प्रेक्षक इतका बेभान होतो की, खाणेपिणे विसरून प्रसंगी पैसे उधार घेऊन नाटकाचे आयोजन करतो. चार ते पाच वर्षांपूर्वी दिवाळीनंतर बैलांची जंगी शंकरपट भरविली जायची मात्र शंकरपट आयोजनावर बंदी आल्याने आता मंडई भरविली जाते. याकरिता गावसमाज बैठक घेऊन एक दिवस ठरवतो. दिवसा मंडई आणि रात्री नाटक आयोजित केले जाते. मंडई आणि नाटक हे समीकरण आता झाडीपट्टीत रुजत आहे. आधीच्या आणि आताच्या मंडई आणि नाटकांच्या सादरीकरणात काळानुसार बदल झाला असला तरी मूळ हेतू तोच आहे. दिवाळी उत्सवापर्यंत झाडीतील प्रमुख पीक असलेले धानपीक हातात येते. पुढे होळीपर्यंत विरंगुळा असतो त्यामुळे मनोरंजन आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठी त्यातून ज्या घरी उपवर-वधू असतात त्यांना पाहणे, लग्न जोडणे हा हेतू पण यामागे असतो. कला ही दोन व्यक्ती, दोन कुटुंब, दोन गावे यांना जोडणारा पूल आहे. ज्यातून संबंध अधिक दृढ होतात. मंडईसाठी गावातील अथवा गावच्या शिवारातील मोकळी जागा स्वच्छ करून मोकळी केली जाते.मंडईनिमित्त वा इतर प्रसंगीही नाटकाचे एक, दोन किंवा आठ-दहा प्रयोग एकाच गावात रात्री आयोजित केले जातात. गावातील हौशी लोक गावातील कलाकारांच्या संचातील किंवा व्यावसायिक नाट्य रंगभूमीमधून नाटक प्रयोग बुक केला जातो. १९६० ला देसाईगंज येथील अब्दुल अजीज शेख यांनी ‘भारत प्रेस’ ही झाडीपट्टी रंगभूमीवरील पहिली व्यावसायिक रंगभूमी सुरू केली. त्याआधी गावातीलच हौशी कलावंत स्वत: नाटक बसवून काम करीत आणि यावेळी महिलांची भूमिका पुरुष पात्र हेच साकारत असत. परंतु ‘भारत प्रेस’ पाठोपाठ बब्बूभाई पटेल यांनी १९६५ ला महाराष्ट्र प्रेस सुरू केल्याने झाडीपट्टी आणि बाहेरील नागपूर, पुणे येथील महिला कलाकार उपलब्ध केले जाऊ लागल्याने महिला पात्र स्त्रीच साकारू लागली. हौशी कलावंत आणि हौशी नाटक १९६० नंतर आताही सादर होत आहेत; परंतु व्यावसायिक नाट्य कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने हौशी रंगभूमी मागे पडून व्यावसायिक रंगभूमी वरच्या पायदानावर आली आहे. वडसा (देसाईगंज) हे ठिकाण चार जिल्ह्यांना जोडणारे दळणवळणाचे केंद्रबिंदू असल्याने देसाईगंज आज झाडीपट्टी रंगभूमीची राजधानी म्हणून ओळखली व नावाजलेली आहे. याठिकाणी पन्नासच्या घरात नाटक कंपन्या असून देसाईगंज ते लाखांदूर मार्गावर नाटकांचे शेकडो होर्डिंग्ज रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत. या माध्यमातून नाट्य रंगभूमी मालक आपल्या रंगभूमीची जाहिरात करतो यात, नाटकांची नावे, कलाकार, निर्माता, दिग्दर्शक यांचा समावेश असतो.ज्या गावात नाटक आयोजित करायचे असते तेथील मंडळाचे लोक वडसा येथे येऊन पाहणी, चौकशी करतात आणि उत्तम व परवडणारी नाटके बुक करतात. आपल्याच मंडळाची बुकिंग अधिक व्हावी यासाठी सारेच प्रयत्नशील असतात. नाटक बुक झाल्यावर मंडळाचे लोक नाटकाचे बॅनर तयार करतात आणि नाटकाच्या नियोजित तारखेच्या महिनाभराआधीपासून नाटकाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गावोगावी बॅनर लावतात. आपल्या नातलगांना संदेश पाठवतात. जेणेकरून नाटकाला जास्तीत जास्त प्रेक्षक लाभला पाहिजे आणि आपले नाटक सरस ठरले पाहिजे. वडसा येथील पन्नासच्या घरात असलेल्या नाटक कंपन्या दोन हजारांवर नाटकांच्या प्रयोगातून शेकडो कोटींची उलाढाल करतात. यातून दोन ते पाच हजार लोकांना रोजगार सुद्धा प्राप्त होतो. नाटकांची तारीख जसजशी जवळ येते तसतसे गावातील नाटक मंडळ नाटकाच्या रंगमंच तयारीच्या कामाला लागतात. याकरिता सर्वप्रथम गावातील चौकातील तसेच गावाला लागून असलेल्या शेतात दोन हजार लोक बसू शकतील अशी मोकळी जागा व्यसस्थित करतात. मुख्य रंगमंचासाठी जमिनीच्या दोन-तीन फूट उंच इतका मातीचा चौकोनी स्टेज तयार करतात. मातीच्या चौकोनी रंगमंचाच्या चारही बाजूला माती पसरू नये म्हणून लाकडांचा भक्कम आधार दिला जातो. याच स्टेजवर नाटक सादर होते. त्याच्या अगदी समोर तबलावादक, पेटीमास्टर, आॅर्गन आदी वाद्य आणि वादकांना बसण्यासाठी छोटा ओटा तयार केला जातो. त्याच्या समोर मोठ्या आकाराचा दोन फूट खोल चौरस खड्डा खोदला जातो. यामध्ये प्रेक्षकांसाठी शेकडो खुर्च्या ठेवल्या जातात. उरलेल्या जमिनीवर नाट्य रसिक लोकांसाठी सतरंजी टाकली जाते. संपूर्ण नाटक चारही बाजूंनी कापडी पडदे लावून बंद केले जाते. नाटक ज्या दिवशी असते त्याच्या आधीच्या दिवसापर्यंत नाटकपूर्व तयारी पूर्ण होते. नाटकाच्या दिवशी अकरा-बारावाजेपर्यंत साऊंड सर्विसवाले येऊन पोंगे, पडदे, प्रकाश देणारे बल्ब यांची सर्व बांधणी करतात आणि मग नाटक मंडळाचे लोक माईक वरुन जोरजोराने ओरडून नाटकाचा प्रचार करतात. काही अवधीनंतर गाणी वाजविली जातात आणि पुन्हा नाटक वाचून दाखवणे आदी हालचाली नाटक सुरू होईपर्यत सुरू असतात. तोपर्यंत गावात पाहुण्यांचे आगमन झालेले असते. गावाला जणू जत्रेचे रूप प्राप्त होते. विसोरा, कुरूडसारख्या मोठ्या गावांत पाच ते आठ नाट्यप्रयोग एका रात्री उत्सवकाळात सादर होतात. तेव्हा लोकांची खूप गर्दी असते. पोंग्यातून गुंजणारा नाटकांचा आवाज इतका मिसळून जातो की नेमका कोण काय बोलतोय हे गावातील लोकांना समजत नाही. सूर्यास्तानंतर गावाच्या चौकाचौकात पेंडाल आणि दोन-चार खुर्च्या टाकून नाटक तिकीट विक्री सुरू केली जाते. घरोघरी पाहुणे पोहोचली असतात. त्यांच्या मानसन्मानासाठी घरची मंडळी व्यस्त असतात. झाडीपट्टी रंगभूमीची नाटके अकरानंतरच सुरू होते. परंतु दहा वाजतापूर्वीच नाटकाचे मंडप प्रेक्षकांनी भरून असते. मंडळाची माणसे नाटक पेंडाल ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्या प्रवेश तिकिटाची पाहणी आणि तपासणीसाठी गेटवर उभे असतात. आतमध्ये प्रेक्षक प्रवेश करताच प्रेक्षकाच्या तिकीटनुसार नाटक मंडळाचे स्वयंसेवक त्या प्रेक्षकाला आसनावर बसवितात. झाडीत नाटकांचा उद्घाटन सोहळा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा प्रसंग. राजकीय तसेच विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि गावातील तसेच पंचक्रोशीतील मंडळी रंगमंचावर विराजमान होतात. उद्घाटन सोहळा आटोपताच प्रेक्षकांच्या मागणीनुसार लावणी वा चित्रपट गीतावर नृत्य, त्यानंतर नांदी आणि नाटक सुरू होते. झाडीतील नाटकांच्या नावाआधी संगीत लिहिले असते. यावरून नाटकातील पार्श्वसंगीत, संगीत वरच्या रेषेवर असते. तीन अंकी नाटक अकरा ते बारा वाजता सुरू होते आणि सूर्योदयापर्यंत किंवा सूर्योदयाच्या एक तासआधी संपते. झाडीतल्या नाटकांत पार्श्वसंगीत हे नाटकातील कलाकाराच देत असतात. स्टेजवर समोरच्या भागात एक माईक आणि मध्यभागी वरती एक माईक बांधलेले असते. लावणी नर्तिकाच स्वत: लावणीचे गायन करून नाचते. प्रत्येक पात्र आपली भूमिका सादर करतांना माईक जवळ जावून बोलतात. साऊंड सर्विस देणारे नाटकात गरजेच्या वेळी प्रकाशाची सोय करतात.
भाऊबीज ते होळीपर्यंत चालणारी आगळीवेगळी नाट्यपरंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:16 AM