भूमिगत केबल टाका : बोटनफुंडी ते कांदोळीपर्यंत जंगलातून पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : मागील १० दिवसांपासून भामरागड तालुक्यात दिवसा व रात्री सुध्दा कधीही वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीज विभागाने यावर उपाय शोधावा, अशी मागणी होत आहे.भामरागड तालुकास्थळासह इतर ग्रामीण भागाला एटापल्ली तालुक्यातून वीज पुरवठा केला जातो. आलापल्लीमार्गे ताडगावपर्यंत लाईन सुरूळीत सुरू राहते. ताडगावपासून बोटनफुंडी-कांदोळी दरम्यानची लाईन जंगलातून आली आहे. वादळवारा झाल्यानंतर या ठिकाणी झाड पडून वीज पुरवठा खंडीत होत असल्याची वीज विभागाचे म्हणणे आहे. मागील १० दिवसांपासून सातत्याने वीज पुवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सर्व वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे, सक्तीचे करण्यात आले असले तरी बहुतांश वीज कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास तो वेळेवर दुरूस्त केला जात नाही. भामरागड हे तालुकास्थळाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी बँकेसह अनेक शासकीय कार्यालये आहेत. मात्र वीज पुरवठा नेहमी खंडीत होत असल्याने जनरेटचा वापर शासकीय कार्यालयांमध्ये करावा लागत आहे. काही कार्यालयांमध्ये बॅटऱ्या आहेत. मात्र या बॅटऱ्या पूर्णपणे चार्ज होण्यापूर्वीच विद्युत पुरवठा खंडीत होतो. विजेच्या लपंडावाने यावर्षी शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याकडे वीज विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.ओव्हरहेड लाईन असल्याने झाड पडून वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे जंगल भागातून भूमिगत केबल टाकून वीज पुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
भामरागडात विजेचा लपंडाव
By admin | Published: July 17, 2017 1:03 AM