लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित भामरागड तालुका अद्यापही पायाभूत सुविधांपासून दूर आहे. या तालुक्याला दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका सहन करावा लागतो. येथे पावसाळ्यात प्राण कंठात आणून लोक दिवस काढतात. पुराचे पाणी घरात शिरणे नेहमीचेच आहे, अशावेळी संसार डोळ्यांदेखत वाहत जातो तर लोकांची स्वतःचा जीव वाचविण्याचीच धडपड सुरू असते. दरम्यान, पुनर्वसनाचा प्रस्ताव दहा वर्षांपासून धूळखात पडून आहे.
निसर्गसंपदेने नटलेल्या भामरागडमध्ये इंद्रावती, पामूलगौतम व पर्लकोटा या तीन नद्यांचा संगम होतो. दरवर्षी येणाऱ्या पुराचा स्थानिक आदिवासींना सामना करावा लागतो. पूर आल्यानंतर शहरात पंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, तहसील कार्यालयासह उंच ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो. घरातील संसारोपयोगी साहित्य डोळ्यांदेखत पाण्यात प्रवाहित होताना पाहून येथील लोकांचे काळीज पिळवटून जाते. मात्र, या संकटात केवळ स्वतःचा जीव वाचविण्यासाठीच धडपड सुरू असते.
१६ वर्षापासून पुलाचे काम रखडलेले• पर्लकोटावरील पूल किमान ४५ वर्षे जुना आहे. दरवर्षी त्यावर १०-१२ फूट पाणी असते. २००८ मध्ये पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय झाला.
• तब्बल १६ वर्षांपासून पुलाचे काम रखडलेले आहे. सध्या पुलाच्या ठिकाणी काम सुरु आहे; पण ते संथ गतीने होत आहे. त्यामुळे भामरागडबद्दलची राजकीय अनास्थाही समोर आली आहे.
• तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी हा तालुका विकासासाठी दत्तक घेतला होता; पण येथे मूलभूत सुविधाच अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे विकासाचे स्वप्न अधुरेच आहे.
नाल्याला पाणी आले तरी तुटतो संपर्क• हलका पाऊस झाला तरी २ तालुक्यातील नाले जलमय होतात. नाल्याला पाणी आले तरी गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे स्थानिकांचे हाल होतात. अनेक गावे दोन-दोन महिने संपर्काबाहेर असतात.
• पक्के रस्ते, दर्जेदार पूल होणे ४ गरजेचे आहेत; पण अनेक गावांत अद्याप विकासवाटा पोहोचलेल्या नाहीत. परिणामी, स्थानिक आदिवासींना नदीतून जाण्यासाठी होडींचा वापर करावा लागतो.