भाजपची आविसंसोबत हातमिळवणी : राष्ट्रवादी काँग्रेससह ३३ सदस्यांची झाली महाआघाडी गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टी, आदिवासी विद्यार्थी संघ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात महाआघाडी तयार झाली. या महाआघाडीच्या वतीने अध्यक्ष पदावर भाजपच्या योगीता मधुकर भांडेकर तर उपाध्यक्ष पदी आविसंचे अजय रामय्या कंकडालवार यांची निवड झाली आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात सभा पार पडली. या सभेला ५१ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी भाजपच्या वतीने अध्यक्ष पदाकरिता योगीता भांडेकर व उपाध्यक्ष पदाकरिता आविसंचे अजय कंकडालवार यांचे नामांकन पत्र दाखल करण्यात आले. तर काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष पदाकरिता आरमोरी तालुक्यातून निवडून आलेल्या सदस्य मनिषा दोनाडकर व उपाध्यक्ष पदाकरिता आष्टी येथून निवडून आलेल्या रूपाली पंदिलवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला. दुपारी २ वाजता मतदान असल्याने सभागृहात भाजपचे सदस्य सर्वप्रथम पोहोचले. त्यांच्या समावेत आदिवासी विद्यार्थी संघ व राष्ट्रवादी काँग्रेसचेही सदस्यही सोबत आले होते. त्यामुळे भाजपच्या खेम्यात ३२ सदस्य असल्याचे स्पष्ट झाले होते. सभा सुरू होण्याच्या काही वेळ पूर्वी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासोबत वर्षा कौशीक सभागृहात पोहोचल्या व हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी भाजपच्या भांडेकर यांना ३३ मते मिळाली. भाजपचे २०, आविसंचे ७, राकाँचे ५ व अपक्षाचे एक मत भाजपच्या बाजुने पडले. तर असेच मतदान उपाध्यक्ष पदासाठी अजय कंकडालवार यांना झाले. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. या विजयानंतर भाजप व आविसं कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद समोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, माजी आमदार दीपक आत्राम, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, राकाँचे नेते ऋतूराज हलगेकर, देसाईगंज न.प.चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, अहेरीचे नगरसेवक गिरीष मद्देर्लावार व भाजप, आविसं, नाविसंचे कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) मावळत्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी केले अभिनंदन जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे व उपाध्यक्ष जीवन नाट यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष योगीता भांडेकर व उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना खुर्चीवर विराजमान केले. भविष्याच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर कुत्तरमारे व नाट यांनी आपल्या खासगी वाहनातून जिल्हा परिषदेचा परिसर सोडला. योगीतांना राजयोग भाजपच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात सध्या योगीता नावाच्या महिलांना राजयोग असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोलीच्या नगराध्यक्ष म्हणून योगीता प्रमोद पिपरे विराजमान झाल्या. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून योगीता मधुकर भांडेकर विराजमान झाल्या आहे. त्यामुळे योगीता नावाला सध्या राजयोग असल्याची चर्चा जि.प.त होती.
भांडेकर अध्यक्ष, कंकडालवार उपाध्यक्ष
By admin | Published: March 22, 2017 1:43 AM