तीन दिवसांची कोठडी : धानोरा न्यायालयात आल्या शरण धानोरा : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या निलंबित मुख्याध्यापिका भारती गुलाब मडावी या मंगळवारी धानोराच्या तालुका सत्र न्यायालयात शरण आल्या. पोलिसांच्या विनंतीनुसार न्यायालयाने मडावीला २० एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. धानोरा पोलीस ठाण्यात भारती गुलाब मडावी यांच्या विरूध्द २३ नोव्हेंबर २०१६ रोजी भादंविच्या ४२०, ४६१, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून त्या फरार होत्या. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र ही याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांना सात दिवसांच्या आत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. भारती मडावी या धानोराच्या न्यायालयासमोर मंगळवारी शरण आल्या. यावेळी धानोरा पोलिसांनी मडावी यांना न्यायालयाने पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. या विनंतीवरून न्यायालयाने भारती मडावीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती धानोराचे पोलीस उपनिरिक्षक अमोल वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना दिली. भारती मडावी यांच्यावर शासकीय शिष्यवृत्ती अपहारासंदर्भात तक्रार शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यातर्फे करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
भारती मडावीला पीसीआर
By admin | Published: April 19, 2017 2:08 AM