१० वर्षांपासून दुरूस्ती रखडली : अपघातांचे प्रमाण वाढलेचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा-लखमापूर बोरी रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर मार्ग दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. भेंडाळा-लखमापूर बोरी मार्गाचे १० वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या मार्गाची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना मार्गक्रमण करताना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर सगणापूर, कान्होली, कळमगाव, एकोडी ही गावे आहेत. त्याचबरोबर सदर मार्ग पुढे आष्टीकडे निघतो. या गावांमधील बहुतांश नागरिक चामोर्शी व भेंडाळा येथे येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावरून खासगी प्रवाशी वाहने व बसही धावते. त्यामुळे सदर मार्ग दुरूस्त करणे व त्याचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे. दोन मोठी वाहने आल्यास ती क्रॉस करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे सदर मार्गाचे रूंदीकरण करण्याची सुध्दा मागणी आहे. मात्र या मार्गाकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. (शहर प्रतिनिधी)
भेंडाळा-लखमापूर मार्ग खड्ड्यात
By admin | Published: July 04, 2016 1:06 AM