पोलिसांचा पुढाकार : २७ दिवसांनंतर कोठी मार्ग अखेर सुरू लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : कोठी- भामरागड मार्गावर हेमलकसाजवळ ३ मे रोजी नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. यात एक जवान शहीद झाला. तर काही जवान जखमी झाले. घटनास्थळी ७ ते ८ फुट खड्डा पडला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे नागरिकांना या मार्गाने ये- जा करणे अडचणीचे होते. नागरिकांनी सदर समस्या पोलिसांकडे मांडली. त्यानंतर मंगळवारी सदर मार्गावरील खड्डा पोलिसांनी बुजविला व २७ दिवसांनंतर वाहतूक सुरळीत केली. भूसुरूंग स्फोटामुळे कोठी- भामरागड-गट्टा-एटापल्ली मार्गे वाहतूक बंद पडली होती. कोठी येथे येणारी बससेवाही बंद झाली होती. त्यामुळे कोठी, मरकनार, तोयनार, मुरमबुसी, तुमरकोडी, पदहूर, पिडमिली, नारगुंडा, हलवेर, कियर, कारमपल्ली आदी गावातील नागरिकांना ये- जा करणे गैरसोयीचे झाले होते. आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी वाहतूक करावी लागत होती. नागरिकांनी पोलिसांकडे समस्या कथन केल्यानंतर एसडीपीओ संदीप गावित यांनी पुढाकार घेऊन खड्डा बुजविण्याचे निर्देश दिले. यशस्वीतेसाठी ठाणेदार संजय सांगळे, पीएसआय शेळके, महागडे, बनकर, अशोककुमार यांनी सहकार्य केले.
भूसुरूंग स्फोटाचा खड्डा बुजविला
By admin | Published: June 01, 2017 1:54 AM