कुलगुरूंचे प्रतिपादन : गडचिरोलीत डिजिटल इंडियावर रासेयो स्वयंसेवकांची कार्यशाळागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंद्यांची वाणवा असल्याने बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यात अनेक समस्या कायम आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी डिजीटल इंडियाची गरज असून डिजीटल इंडिया संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात रोजगार निर्मितीस मोठा वाव आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत गोंडवाना विद्यापीठातर्फे डिजीटल इंडियावरील एकदिवसीय कार्यशाळा स्थानिक पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात शुक्रवारी पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोेलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डॉ. के. व्ही. खादरीनरसिंमया, डिजीटल इंडियाचे प्रतिनिधी मनीष अनावाडीया, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. कल्याणकर म्हणाले, डिजीटल इंडियाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील प्रत्येक खेडेगाव शहरांसोबत जोडल्या गेले पाहिजे, ग्रामीण भागातही तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे, तेव्हाच संपूर्ण भारत सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. के. व्ही. खादरीनरसिंमया म्हणाले, डिजीटल इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या संकल्पनेचा प्रचार व प्रसार गावापर्यंत करतील, यातून गावपातळीवर डिजीटल इंडिया ही संकल्पना पोहोचण्यास मदत होईल, डिजीटल इंडियाच्या संकल्पनेतून विकसित तंत्रज्ञानातून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी डिजीटल इंडियाचे प्रतिनिधी मनीष अनावाडीया यांनी सदर संकल्पनेतील तांत्रिक बाबी स्पष्ट करून सविस्तर माहिती दिली. उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. रोकडे, संचालन रासेयो प्रभारी डॉ. नरेश मडावी यांनी केले तर आभार डॉ. प्रिया गेडाम यांनी मानले. या कार्यशाळेत गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयातील २०० रासेयो स्वयंसेवक तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. डॉ. मिलींद जांभुळकर, प्रा. पिसे, डॉ. शर्मा, प्रा.दरेकार यांच्यासह २० कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे ३० अधिकारी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. नंदकिशोर माने, प्रा. कागे, प्रा. बागडे, प्रा. गचके, प्रा. मसराम, प्रा. बोधाने, प्रा. गिरडे, प्रा. प्रीती काळे यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेदरम्यान रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यांसाठी प्रहसन (पथनाट्य), पोस्टर, वक्तृत्व व प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. (स्थानिक प्रतिनिधी)
डिजिटल इंडियातून रोजगार निर्मितीस मोठा वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 2:03 AM