लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील पक्ष्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्याच्या वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. मागील ४० वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांचे आगमन होण्याची परंपरा कायम आहे. पक्ष्यांच्या आगमनाने पुन्हा वघाळा गावात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.या पाहुण्या पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी वघाळावासीय सज्ज झाले असून गावातील वन्यजीव पक्षी संरक्षण समितीने उपाययोजना केल्या आहेत. साधारणत: वघाळा (जुना) येथे एप्रिल, मे महिन्यात स्थलांतरित पक्ष्यांचे नित्यनियमाने आगमन होते व हे पक्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाच ते सहा महिने गावातच मुक्कामाला असतात. वघाळात ४७ चिंचेची मोठी झाडे आहेत. या चिंचेच्या झाडावर घरटी बांधून हे पक्षी अंडी घालत असतात. विविध जातीचे पक्षी येथे गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत. ओपनबिल स्टॉर्क, व्हॉईट आयबिस, ब्लाक कारर्मोरन्ट, कॅटल ईग्रेट, करकोचा, चेस्टनट बिटन, पेन्टेड स्टॉर्क अशा विविध जातीचे पक्षी वघाळा येथे येत असतात. वघाळा येथे पक्ष्यांसाठी पोषक वातावरण, नदीकिनारा व नदीपात्रात मिळणारे शंख, शिंपले, इतर खाद्य, मुबलक पाणी तसेच वघाळावासीयांकडून मिळणारे विशेष संरक्षण यामुळे वघाळा गाव स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांसाठी माहेरघर ठरले आहे. परिणामी दरवर्षी या गावाकडे पक्ष्यांचा ओघ वाढत आहे.विदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची संख्या कुठेच पाहायला मिळत नाही. त्यामुळे पाहुणे पक्षी पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासक तसेच वन्यजीवप्रेमी दरवर्षी या गावाला भेटी देत असतात. पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन व्हावे म्हणून येथे पक्षी संरक्षण वनोद्यानाची निर्मिती करण्यात आली. मात्र या उद्यानात अनेक सोयीसुविधा करण्याचे काम अद्यापही शिल्लक आहे. शासन व प्रशासनस्तरावरून येथे सोयीसुविधा पुरविण्याची मागणी आहे.पक्षी पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावघाळा गावात गेल्या ४० वर्षांपासून येथे दरवर्षी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन होत असते. या ठिकाणी पर्यटकांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. वघाळा येथे चिल्ड्रन पार्क व रेस्टारेन्ट होणे आवश्यक आहे. पर्यटकांना पक्षी पाहण्यासाठी वॉच टॉवर तसेच गावाला नदी लागून असल्याने गावाला संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या दृष्टीने येथे सर्व सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी वघाळा गावाला पक्षी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी वन्यजीव पक्षी संरक्षण समितीचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, संदीप प्रधान, धनराज दोनाडकर, मंदा खरकाटे आदींनी केली आहे.
वघाळात पक्ष्यांचा किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:36 PM
गडचिरोली जिल्ह्यातील पक्ष्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्याच्या वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. मागील ४० वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांचे आगमन होण्याची परंपरा कायम आहे. पक्ष्यांच्या आगमनाने पुन्हा वघाळा गावात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.
ठळक मुद्देस्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांचे झाले आगमन : ४० वर्षांपूर्वीपासूनची परंपरा कायम