पशुवैद्यकीय सेवा कोलमडली : शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीआरमोरी : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे रिक्त असून प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावरच आरमोरीचा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. या मुद्यांवरून आरमोरीच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी पशुवैद्यकीय दवाखान्यावर धडक दिली. दरम्यान, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दवाखान्यातील विविध समस्या जाणून घेतल्या.आरमोरी शहरातील पशुवैद्यकीय सेवा कोलमडल्यामुळे पशुधन धोक्यात आले असल्याच्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी भाजप पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या. या तक्रारीची दखल घेत भाजपाचे तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, सुनील नंदनवार, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुधीर सपाटे यांच्या नेतृत्त्वात भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आरमोरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांच्याकडून कार्यकर्त्यांनी समस्या जाणून घेतल्या. दरम्यान येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाच पदे मंजूर आहेत. यापैकी सहायक आयुक्तांचे पद २८ फेब्रुवारीपासून तर वनोपचाराचे पद ३१ मार्चपासून तसेच लिपिकाचे पदही रिक्त असल्याचे निदर्शनास आले. या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात आरमोरी, रामाळा, शिवणी, सायगाव, वघाळा, अरसोडा, रवी, मुल्लुर, मुल्लुर चक, पालोरा आदी गावे येतात.पावसाळ्याच्या दिवसात वेळेवर औषधोपचार मिळत नसल्याने तालुक्याच्या अनेक गावातील जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. २०११ मध्ये औषधसाठा उपलब्ध करण्यासाठी केवळ १२ हजार रूपयांचे अनुदान दवाखान्याला मिळाले होते. मात्र तेव्हापासून आजतागायत औषधी साठ्याकरिता अनुदान प्राप्त झाले नाही. परिणामी आरमोरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब यावेळी निदर्शनास आली. (प्रतिनिधी)आवश्यकता नसतानाही दीड कोटींचे बांधकाम सुरूआरमोरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या औषधोपचारांसाठी निधीअभावी औषधसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे दवाखान्यात तपासणी करण्यासाठी जनावरे आणलेल्या शेतकरी व पशुपालकांना बाहेरच्या दुकानातून औषधी खरेदी करावी लागते. परिणामी अनेक पशुपालकांची परिस्थिती बेताचीच असल्याने औषधीअभावी जनावरे दगावतात. अशी दयनीय परिस्थिती असताना प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. मात्र आवश्यकता नसताना दवाखान्याच्या इमारत बांधकामासाठी १ कोटी ६० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून इमारत बांधकाम सुरू आहे. औषधसाठा उपलब्ध नसल्याने इमारतीचा काय उपयोग, असा सवाल भाजपने केला आहे.
भाजप कार्यकर्त्यांची पशुवैद्यकीय दवाखान्यावर धडक
By admin | Published: August 13, 2015 12:23 AM