वैरागड : आरमोरी तालुक्यातील सर्वात जास्त १३ सदस्य संख्या असलेल्या वैरागड ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली. ज्या उमेदवाराने विजयाचे बांध बांधले होते ते माजी सरपंच सेवानंद सहारे, उपसरपंच श्रीराम अहिरकर, शिवशाही पॅनलचे भोलू सोमाणी यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत आपला गाव आपला विकास आघाडीला केवळ २ जागेवर समाधान मानावे लागले. या ग्रामपंचायतीत भाजप प्रणीत पॅनलला ६ जागा मिळाल्या.
वैरागडमध्ये बहुमतासाठी १३ पैकी ७ जागांची आवश्यकता आहे. यापैकी ६ जागांवर भाजपप्रणीत पॅनलला विजय मिळविता आला. विजयी उमेदवारांमध्ये भास्कर बोडणे, छानू मानकर, मनीषा खरवडे, रेखा भैसारे ,संगीता मेश्राम, प्रतिमा बनकर आदींचा समावेश आहे. काँग्रेस प्रणीत गावविकास पॅनलच्या संगीता पेंदाम, सत्यदास आत्राम विजयी झाले. याशिवाय शिवशाही ग्रुपने ४ जागांवर विजय मिळविला. यामध्ये शीतल सोमनानी, दीपाली मेहेरे, गौरी सोमाणी, आदेश आकरे विजयी झाले. तर चंद्रविलास तांगडे हे अपक्ष म्हणून निवडून आले. एकाही पॅनलला बहुमत नसल्याने अपक्ष उमेदवाराला उपसरपंच पद मिळाल्यास भाजप समर्थित पॅनलला आपली सत्ता मिळू शकते.