गडचिरोली : महाड येथे चवदार तळ्याजवळ मनुस्मृती दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या कथित आरोपावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात येथे ३० मे रोजी भाजपने जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील मुख्य चौकात आव्हाडांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारुन संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या आंदोलनावरुन सध्या राजकारण तापले आहे. याविरुध्द भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून याचे पडसाद गडचिरोलीतही उमटले. शहरातील इंदिरा गांधी चौकात ३० मे रोजी सकाळी १० वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, वर्षा शेडमाके, लक्ष्मी कलंत्री, त्रिशा डोईजड, विलास भांडेकर, मुक्तेश्वर काटवे, बंडू झाडे आदी उपस्थित होते. या आंदोलनाने इंदिरा गांधी चौकाचा परिसर दणाणून गेला होता.