लाेकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : कमलापूर व पातानील येथील हत्ती गुजरातला हलवू नयेत, या मागणीसाठी शुक्रवारी काँग्रेसने कमलापुरात आंदोलन केले; तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आलापल्ली येथील शहीद अजय मास्टे चौकात चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. त्यानंतर खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन हत्तींबाबत भूमिका स्पष्ट केली. हत्ती गुजरातला जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कमलापूर आणि पातानील येथील हत्ती गुजरातला जाऊ नयेत, अशी लोकांची मागणी आहे. वास्तविक गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती कधी स्थानांतरित करायचे आहेत, याबाबतची सूचना अजून आलेली नाही. यात केंद्राचे नाव पुढे करून आपल्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनाही तसे पत्र अद्याप आले नसल्याचे खासदार म्हणाले.पत्रकार परिषदेला बाबूराव काेहळे, विनोद अक्कनपल्लीवार, सागर डेकाटे, रवी नेलकुदरी, संदीप कोरेत, रवींद्र ओल्लालवार, मोहन मदने, पोशालू चौधरी, गुरुदास मडावी, आदी उपस्थित होते.
राज्याने पुढाकार घ्यावा, केंद्राकडून मदत मिळेल- वास्तविक या प्रकरणात मुख्य भूमिका ही राज्याची असते. त्यामुळे राज्याने योग्य तो निर्णय घ्यावा. राज्य शासनाने येथे सर्व सोयींची परीपूर्तता करावी. हवी असल्यास त्यांनी केंद्राची मदत घ्यावी. यासाठी राज्याला हवी ती मदत केंद्र शासन करण्याला तयार आहे. विरोधकांनी या विषयावर केवळ राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. विशेष म्हणजे, दाेनदिवसापूर्वी खा.नेते यांनी केंद्र सरकारच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.