संजय तिपाले, गडचिरोली : काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून १८ डिसेंबर रोजी दुपारी अचानक भाजपचे कमळ चिन्ह पोस्ट झाले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. डॉ. उसेंडी यांनी हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप करून हे कमळ चिन्ह हटवले. मात्र, या पोस्टची दिवसभर खमंग चर्चा रंगली.
आदिवासी विद्यार्थी संघाच्या मुशीत तयार झालेले नामदेव उसेंडी हे पेशाने वैद्यकीय अधिकारी होते. समाजकारणातून नंतर ते राजकारणात आले. राष्ट्रवादी काँग्रेस ते काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. २००९ मध्ये काँग्रेसकडून गडचिरोली क्षेत्रातून त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत पाऊल ठेवले. त्यानंतर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावले, पण त्यांचा पराभव झाला, त्याच वर्षी त्यांनी लोकसभाही लढवली, पण यश आले नाही. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता लोकसभेसाठी ते काँग्रेसकडून तिसऱ्यांदा इच्छुक आहेत. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी दुपारी अचानक त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून कमळाचे चिन्ह पोस्ट झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांत एकच गोंधळ उडाला. मात्र, तासाभराच्या आत त्यांनी ते कमळ चिन्ह आपल्या अकाउंटवरून हटविले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची डॉ. उसेंडी यांच्यावर मर्जी आहे, त्यामुळे काहींनी या पोस्टखाली सूचक कमेंटही केल्या.
काँग्रेस हा तळागाळातील जनतेला न्याय देणारा पक्ष आहे व मी या पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करत आहे. आजही येणापूर येथे पक्ष कार्यक्रमातच आहे. राजकीय विरोधकांनी माझे फेसबुक अकाऊंट हॅक करत कमळ चिन्ह पोस्ट करून मुद्दाम कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही विश्वास ठेऊ नये. हा विरोधकांचा खोडसाळपणा आहे. - डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार