गडचिरोली : झारखंडचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या दहा ठिकाणांवर आयकर विभागांनी छापे टाकले. यात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या कारवाईनंतर साहू यांच्याकडे आढळलेल्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी भाजप महिला मोर्चाने येथील इंदिरा गांधी चौकात ११ डिसेंबरला जोरदार निदर्शने केली. मोहब्बत की दुकान, चोरी का सामान... अशा घोषणा देऊन काँग्रेसविरुध्द हल्लाबोल केला.
यावेळी खासदार धीरज साहू यांचा निषेध नोंदविण्यात आला. काँग्रेसकडे बेहिशेबी मालमत्ता जमवणारे नेते आहेत, त्यांच्या हाती देशाची सत्ता सुरक्षित नव्हती, म्हणूनच जनतेने भाजपला संधी दिली, असा दावा यावेळी महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, प्रकाश गेडाम,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खट्टी, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, अनिल कुनघाडकर, तालुका महामंत्री बंडू झाडे, केशव निंबोड, अरुण नैताम, देवाजी लाटकर, मोरेश्वर भांडेकर, शाम वाडई, प्रतिभा चौधरी, लता लाटकर, वैष्णवी नैताम, पल्लवी बारापात्रे, पूनम हेमके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोषणांनी दणाणून गेला परिसर
पदाधिकाऱ्यांनी हातात विविध फलक घेऊन आंदोलन केले. काँग्रेस गोलमाल जनतेचे हाल... मळलेला हात करतो जनतेचा घात... काँग्रेस हटाव गरीब बचाव... अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे चौक परिसर दणाणून गेला.