गडचिरोली : भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील जनसंवाद यात्रा २३ ऑगस्टला गडचिरोलीत दाखल झाली. आमदार डॉ.देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे हे तेलंगणातील हैद्राबादमध्ये पक्षाचे विस्तारक म्हणून गेलेले असल्याने प्रदेशाध्यक्ष गडचिरोलीत असतानाही त्यांची अनुपस्थिती होती.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे शहरातील इंदिरा गांधी चौकात सकाळी साडेअकरा वाजता आगमन झाले. यावेळी खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी त्यांचे स्वागत केले.
त्रिमूर्ती चौकातून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेत बानवकुळे यांनी मोदी सरकाने नऊ वर्षांत केलेल्या विविध विकासकामांसह योजनांचे पत्रक नागरिकांना दिले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांशी संवाद साधला. दुपारी २ वाजेनंतर ते प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. यावेळी मार्गदर्शन करुन कार्यकर्त्यांशी खुला संवाद करणार आहेत.
माजी मंत्री अम्ब्रीशराव दूर, फोटोही गायब
दरम्यान, माजी मंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे भाजपच्या जनसंपर्क यात्रेत दिसले नाहीत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्ह्यात असताना त्यांच्या अनुपस्थितीची भाजप वर्तुळात चर्चा होती. विशेष म्हणजे जनसंवाद यात्रेतील वाहनावरील पोस्टरवर देखील अम्ब्रीशराव यांचा फोटो गायब होता. संपूर्ण यात्रेत खा. नेते यांचा प्रभाव दिसत होता.