गडचिरोली : शेतकऱ्यांकडील धान हमीभावाने खरेदी करण्याची मर्यादा एकरी ९.६० क्विंटलवरून एकरी २० क्विंटल करावी, तसेच वनहक्क पट्टेधारक आणि वर्षानुवर्षे अतिक्रमित जमीन कसणाऱ्या काबिल कास्तकारांकडीलही धानाची खरेदी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास १ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने सर्व खरेदी केंद्रांवर आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले.यावेळी आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी यावेळी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. विशेष म्हणजे लगतच्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यात धान खरेदीची मर्यादा जास्त असताना गडचिरोली जिल्ह्यावरच हा अन्याय का? असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. धान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नवीन खरेदी केंद्र सुरू करावे आणि खरेदीच्या प्रक्रियेला गती देऊन शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
(बॉक्स)
पैसेवारी गावनिहाय, पण खरेदीचा नियम सारखा
यावर्षी धानाचा उतारा कमी येणार असल्याचे प्रशासनाच्या पैसेवारी अहवालात म्हटले आहे. पण ही पैसेवारी गावनिहाय वेगवेगळी आहे, मग खरेदीची मर्यादा मात्र सर्वांना सारखीच लागू करणे जास्त उत्पन्न आलेल्या शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. पैसेवारी कमी असेल तर पीक विम्याचा लाभ द्यावा, पण तेही मिळाले नाही, अशी व्यथा यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.