पत्रकार परिषद : नामदेव उसेंडी यांचा आरोपगडचिरोली : जिल्हा परिषद ही मिनीमंत्रालय आहे. या मंत्रालयातून ग्रामीण भागाच्या विकासाचे काम चालते. परंतु ही विकास प्रक्रिया खंडीत करून आपल्या पक्षाकडे जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्याच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षाने सभापती अतुल गण्यारपवार व अजय कंकडालवार यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव पारित करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्या नितीचा वापर भाजपकडून करण्यात आला. या परिस्थितीतही जनतेच्या आशिर्वादामुळे घटस्थापनेला भारतीय जनता पक्षाला प्रचंड हादरा यानिमित्ताने बसला, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केला. डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, गडचिरोली जिल्हा विकास निधी नैसर्गिक न्यायानुसार प्रत्येक वर्षाला १० टक्के वाढायला हवा. परंतु भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या निष्क्रीयतेमुळे सहा कोटीने तो कमी झाला आहे. नियोजन समितीच्या बैठकीत नियोजनाऐवजी भलत्याच बाबींवर चर्चा करून या बैठकीला पक्षाच्या बैठकीचे स्वरूप आणण्यात आले आहे, असा आरोप डॉ. उसेंडी यांनी केला. दोन-दोन महिने जिल्हा परिषद सदस्यांना तिर्थयात्रेसाठी घेऊन जाऊन विकास प्रक्रिया ठप्प करण्याचे काम भाजपच्या नेतृत्वात झाले. ही लोकशाहीची थट्टा असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत सभापती अतुल गण्यारपवार यांनी जिल्हा परिषदेच्या अविश्वास प्रस्तावात मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाल्याचा थेट आरोप केला. अनेक सदस्यांना पैशाचे आमिष दाखवून आपल्या बाजुने वळते करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही ते म्हणाले. जिल्हा विकासाकडे भारतीय जनता पक्षाचे लक्ष नसल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार दीपक आत्राम, काँग्रेस नेते रवींद्र दरेकर, मनोहर पाटील पारेटी, अॅड. गजानन दुगा, सभापती देवेंद्र भांडेकर, प्रभाकरराव वासेकर, शंकरराव सालोटकर, काशिनाथ भडके, परमानंद मलिक उपस्थित होते.
जि.प.तील विकास प्रक्रिया खंडीत करण्याचा भाजपचा प्रयत्न
By admin | Published: October 14, 2015 1:49 AM