गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सत्तेला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने भाजपकडून ३० मे ३० जून दरम्यान महाजनसंपर्क अभियान राबविणार आहेत. यातून मोदी सरकारने केलेली कामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून यासाठी जिल्ह्यात केंद्रीय मंत्री येणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी २९ मे रोजी येथे पत्रकार परिषदेत दिली.
आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे, रमेश बुरसे, रेखा डोळस आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसवर टीका केली. देशाचा कारभार ६० वर्षे काँग्रेसकडे होता, तेव्हा विकास खुंटला होता. नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत देशाला प्रगतीकडे नेले. डिजिटल इंडियामुळे भ्रष्टाचार रोखण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात साडेचौदा हजार कोटींची विकासकामे केली. यातून महामार्ग, पूल, वैनगंगा नदीवर सिंचन प्रकल्प करता आले. वडसा- गडचिरोली, गडचिरोली- धानोरा, नागभिड- नागपूर या तीन रेल्वेमार्गाची कामे मंजूर झाली आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती आल्याचे त्यांनी सांगितले.
२० ते ३० जून विविध संमेलने
जिल्ह्यात ३० ते ३० जून दरम्यान विविध संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. यात लाभार्थी, व्यापारी, बुध्दिजिवी वर्ग, आदिवासी, ओबीसी, युवा, महिला यांची संमेलने होणार आहेत. या दरम्यान केंद्रीय मंंत्र्यांनांनी निमंत्रित केले आहे. याची जय्यत तयारी सुरु असल्याचे खासदार अशोक नेते यांनी सांगितले.