दिगांबर जवादे, गडचिराेली : मोबाइलवर संपर्क करुन एका पोलिस कर्मचाऱ्याने तरुणीशी ओळख निर्माण केली. त्यानंतर पत्नीशी घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून प्रेमसंबंध निर्माण केले व त्याआधारे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड लाखांचे दागिने व सव्वा तीन लाखांची मागणी केली. कायद्याच्या रक्षकानेच तरुणीचे शोषण केल्याची ही खळबळजनक घटना २३ जूनला उघडकीस आली.
पद्माकर भगवान भाेजने (३८) असे त्या पोलिस शिपायाचे नाव असून त्यास गडचिरोली पोलिसांनी जेरबंद केले आहे. तो पाेलिस मुख्यालयात कार्यरत हाेता. ताे विवाहित असून पीडित २७ वर्षीय तरुणी शिक्षण घेते. पत्नीसाेबत साेडचिट्टी झाली असल्याची खाेटी माहिती पद्माकरने पीडित युवतीला दिली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.
पीडित युवतीने लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिला. त्यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरु केले. दीड लाखांचे दागिने व सव्वा तीन लाखांची मागणीही केली. याची ती पूर्तता करु शकत नव्हती. त्यामुळे तिने २२ जूनला गडचिरोली ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन बलात्कार व ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला. तपास उपअधीक्षक सूरज जगताप करत आहेत.तीन दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, २३ जून रोजी पोलिसांनी पोलिस शिपाई पद्माकर भोजने यास जेरबंद केले. त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पो.नि. अरुण फेगडे यांनी दिली.