मुख्यमंत्र्यांकडे मागणी : अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांचे निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राज्यातील शेतकरी १ जूनपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, शेतातील उत्पादीत शेतमालाला उच्च भाव द्यावा, अशी मागणी अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. राज्यात विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आठवडाभरापासून राज्यव्यापी संप सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे हाल होत असतानाही शेतकऱ्यांना केवळ पोकळ आश्वासन शासनाच्या वतीने दिले जात आहे. दिवसेंदिवस शेती तोट्याची होत असून शेती कसण्यासाठी होत असलेला खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देणे गरजेचे आहे. सोबतच शेतकऱ्यांवर असलेले कर्ज माफ करणे व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. अहेरी उपविभागात नदी, नाले व तलावाच्या परिसरात शेती आहे, परंतु येथे सिंचनाची योग्य सोय नसल्याने पाण्याअभावी धानपीक मरते. दिवसेंदिवस शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे. या भागातील शेतकरी उदनिर्वाह करण्याकरिता लगतच्या आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, चेन्नई आदी ठिकाणी स्थलांतर करीत आहे. या भागातील शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी शासन कुठल्याही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे हित साधण्याकरिता सिंचनाची सोय उपलब्ध करावी. १ जूनपासून राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्ठात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करून कर्जमाफी द्यावी व सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी रियाज शेख, सुरेंद्र अलोणे, गोपाळा मडावी, नारायण अलोणे, दिनेश मडावी, मनोज अलोणे, सय्यद मुज्जफर, विमदेव नैताम, जाकिर हुसेन, वसंत नैताम, मेहबुब खान पठाण, रूक्माबाई चांदेकर, विश्वनाथ आत्राम, राजरेड्डी आल्लुरवार, मखमुर शेख, इकबाल सय्यद, युनुस सय्यद, मंजूर सय्यद, राम गुरनुले, बापूजी ठाकरे, सत्यवान मारटकर, सुधाकर नैताम, श्यामराव मेश्राम, भीमराव ओंडरे, बापू मडावी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
By admin | Published: June 09, 2017 1:06 AM