लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारी सकाळी प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन बेपत्ता वनरक्षकांचे मृतदेह आज सोमवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान तेलंगणा हद्दीत सापडले असून तेलंगणा पोलिसांंनी ते ताब्यात घेतले आहेत.अशी आहे ही घटनाअहेरीपासून तीन किमी अंतरावरील वांगेपल्ली घाटावर प्राणहिता नदीच्या पात्रात नाव उलटल्याने तेलंगणातील दोन वन कर्मचारी पाण्यात बुडाले होते. नावेतील चौघांचे प्राण वाचले. सदर घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली होती.मुंजम बालकृष्णा रा. कागजनगर व सुरेश बानावत रा. केरझारी ता. आदिलाबाद (दोघेही तेलंगणाचे रहिवासी) अशी त्यांची नावे आहेत. वांगेपल्लीजवळ प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने नागरिकांना नावेतून प्रवास करावा लागतो. नदीपलीकडील तेलंगणावासीयांची ये-जा नावेनेच सुरू राहते.रविवारी सकाळी वांगेपल्ली येथील गंगा नामक नावचालक व त्याच्या साथीदाराने तेलंगणाला जाण्यासाठी नाव काढली असता तीन वन कर्मचारी व एक मेंढपाळ असे आणखी चौघे बसले. लहान असलेली नाव नदीपात्राच्या मध्यंतरी गेल्यानंतर अतीवजनामुळे पाण्यात बुडाली. नाव चालक, त्याचा सहायक, मेंढपाळ व एका वन कर्मचाऱ्याला पोहता येत असल्याने ते पाण्याबाहेर निघाले. मात्र दोन वनकर्मचाऱ्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले.घटनेनंतर अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रविण डांगे, तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, तलाठी व्यंकटेश जल्लेवार, अहेरीचे माजी सरपंच रामेश्वर आत्राम यांच्या मार्गदर्शनात रविवारी दिवसभर शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र बेपत्ता असलेल्यांचा शोध लागला नाही. प्राणहिता नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे शोध घेताना अडचणी येत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गडचिरोलीतील प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन वनरक्षकांचे मृतदेह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 11:56 AM