गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा टोली येथील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळच्या बोडीत (छोटा तलाव) आढळल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे त्या मुलीचे आई-वडील मजुरीसाठी वर्धा जिल्ह्यात गेले असताना ही घटना घडली. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशातून झाला, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, किरण सुनील चंदनखेडे (१५ वर्ष) असे त्या मृत मुलीचे नाव आहे. ती नवव्या वर्गात शिकत होती. तिचे आई-वडील सोयाबीन कापणीसाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात गेले होते. घरात तिची आजी आणि लहान भावासह ती राहात होती. दरम्यान, १५ ते १६ च्या दरम्यान ती घरी आलीच नाही. त्यामुळे १६ ला किरणच्या काकांनी तिच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली.
दरम्यान तिचे आई-वडील गावी पोहोचल्यानंतर शोधाशोध करण्यात आली; पण तिचा थांगपत्ता लागला नाही. रविवारी (दि.१७) गडचिरोली पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली. दरम्यान सोमवारी सकाळी गावातील गुराखी वसंत नन्नावरे तिकडे शौचास गेला असताना त्याला किरणचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
हा घातपात आहे की आत्महत्या? आत्महत्या असेल तर ती कोणत्या कारणातून? तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे कोण? घातपात असेल तर कोणी तिला मारले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
व्हिडिओ शुटींगमध्ये पंचनामा
पोलिसांनी व्हिडिओ शुटींग करत घटनास्थळी पंचनामा केला. नंतर मृतदेह बाहेर काढून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या चमूने सायंकाळी शवविच्छेदन केले. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि तिच्या अंगावर मार लागल्याच्या काही जखमा आहेत का, हे कळू शकेल. पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.