ताडगावात सोय : पोलीस मदत केंद्र व सीआरपीएफच्या ९ बटालीयनचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : पशु पक्षी व प्राणी ही निसर्गाला लाभलेली देण आहे. निसर्गात संचार करणाऱ्या प्राणीमात्रांवर दयेची थाप मारत काहीजण त्यांच्यावर माया दाखवित आहेत. तर काही ठिकाणी त्यांचा बळी घेतला जात आहे. या विघातक कृत्याला आळा घालण्यासाठी प्रशासकीय सेवा बजाविणाऱ्या अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्र व सीआरपीएफ ९ बटालीयनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उन्हाच्या तीव्र झळा अंगावर घेत पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या पाळीव जनावरांसाठी मदत केंद्राच्या आवारातच माणुसकी दाखवित हौद बांधला. मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना नागरिकांसह मुक्या जनावरांना या उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून जंगल परिसरात चराईसाठी जाणाऱ्या पाळीव जनावरांना जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने गावातील नागरिकांच्या घरी तहान भागविण्यासाठी शिरकाव करावा लागत आहे. यात काही नागरिकांकडून मुक्या जनावरांना काठीने मारझोडही केली जाते. ही बाब हेरून पाळीव जनावरासाठी पोलीस मदत केंद्र ताडगाव व सीआरपीएफ ९ बटालीयनच्या वतीने प्रभारी अधिकारी एम. बी. परजने यांच्या पुढाकाराने उन्हाळ्याच्या दिवसांत जिथे माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी काही अंतर भटकंती करावी लागते. अशा अतितीव्र पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये माणुसकी दाखवित मुक्या प्राण्यांसाठी सिमेंटचा हौद बांधण्यात आला. तेथे २४ तास पाण्याची सोय करण्यात आली. त्यामुळे पाळीव जनावरांसाठी सोयी झाली आहे. सदर परिसरात १५० ते २०० मुक्या प्राण्यांची रणरणत्या उन्हाळ्यामध्ये तहान भागविण्याचा अतुलनीय व प्रशंसनीय काम केल्याने सदर परिसरामधील नागरिकांकडून पोलीस मदत केंद्र ताडगावची प्रशंसा केली जात आहे.
पाळीव जनावरांसाठी बांधला हौद
By admin | Published: May 27, 2017 1:27 AM