२७ जूनपासून शाळा पुन्हा गजबजणार : पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : दीड ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता २७ जूनपासून नर्सरी ते माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये पुन्हा गजबजणार आहे. यासाठी अनेक ठिकाणी पालकांची लहान मुलांच्या अॅडमिशनसाठी तर अनेकांची पाल्यांच्या नवीन वर्षाच्या वह्या, पुस्तके व गणवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. यंदा महागाईमुळे या सर्व बाबीदेखील काहीशा प्रमाणात महागल्याने पालकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे. वह्या, पुस्तके, गणवेशासाठी पालकांची धावपळ वाढली असून जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून नर्सरी ते माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुरुवात होणार आहे. यासाठी पालकांना नोकरी सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी देखील धावपळ करावी लागणार आहे. लहान मुलांच्या नवीन वर्षाचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. बाजारात वह्या, पुस्तके व विविध शाळांचे गणवेश विक्रीसाठी आलेले आहेत. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षाच्या पाठ्यपुस्तकांची यादी लावण्यात आलेली आहे. त्यानुसार पालकांना आपल्या पाल्यांसाठी शाळेचे साहित्य खरेदी करावयाचे आहे. अनेक शाळांनी हे साहित्य खरेदी करण्यासाठी शाळेतून दुकानाची नावेदेखील सुचविली आहे. यासाठी पालकांनी आतापासून मुलांच्या गणवेशासाठी लगबग सुरू केली. गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेल्या शाळा आता पुन्हा २६ जूनपासून गजबजणार आहे. परिणामी लहान मुलांना पुन्हा अभ्यासाच्या पुस्तकांचे ओझे पाठीवर घेऊन जावे लागणार आहे. पालकांकडून पाल्यांसाठी नवीन स्कूल बॅग, वॉटर बॅग, टिफीन खरेदी केले जात आहे. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्याची खरेदी सुरू आहे. इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांचा खर्च वाढला गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र गल्लीबोळात इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटची संख्या भरमसाठ वाढली आहे. सर्वसामान्य पालकही आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करीत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत महागडे प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क व इतर शुल्कापोटी प्रचंड पैसे मोजावे लागत आहे. सर्वसामान्य पालकांचे कंबरडे मोडत आहे.
वह्या, पुस्तके खरेदीची लगबग वाढली
By admin | Published: June 15, 2017 1:33 AM