गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाने २ ऑक्टोबर २०२३ रोजी १२ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत १३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण, परीक्षा भवन व मॉडेल कॉलेज भवनाचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन २ ऑक्टोंबर रोजी सोमवारला करण्यात आले. दरम्यान धानोरा मार्गावरील सेलिब्रेशन हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मात्र विद्यापीठाच्या या सर्व कार्यक्रमांना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पाठ फिरवली.
गोंडवाना विद्यापीठाच्या सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्य अतिथी म्हणून अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित राहणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने पत्रपरीषदेतून सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे सदर दोन्ही मंत्र्यांची नावे अतिथी म्हणून कार्यक्रम पत्रिकेत नमुद आहेत. मंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याच्या खात्रीने प्रशासनाने सदर सोहळ्याची जोरदार तयारी सुद्धा केली. मात्र दोन्ही मंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने उपस्थितांचा काहीसा हिरमोड झाला.
दरम्यान जिल्हाधिकारी संजय मीणा, आमदार डॉ. देवराव होळी, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, जीवन साधना गौरव पुरस्काराचे मानकरी डॉ. सतिश गोगुलवार, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा विविध पुरस्कार प्रदान करून गाैरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, संचालन डो. शिल्पा आठवले यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.