तानबोडी जंगल परिसर : वन विभागाच्या पथकाने केली कारवाईअहेरी/आलापल्ली : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच यंदा जंगलांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी दक्ष झाले असून जंगलांना आगी लावणाऱ्या नागरिकांना अटक करण्यासाठी वन विभागाने विशेष अभियान हाती घेतले आहे. याअंतर्गत अहेरी वन परिक्षेत्रातील तानबोडी जंगल परिसरात आग लावताना दोघा जणांना अटक करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४०० चौ.मी पेक्षा अधिक आहे. त्यापैकी ८० टक्के भूभाग हा जंगलाने व्याप्त आहे. या जंगलात विविध प्रकारच्या वनोपजाचे उत्पादन होते. उन्हाळ्यात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतो. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी मार्च, एप्रिल महिन्यात आगी लागण्याच्या घटना घडतात. वणवा लागून जंगलातील जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे जंगलातील आगी रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे. अहेरी वन विभागाच्या पथकाने १० एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अहेरी वनपरिक्षेत्राअंतर्गत तानबोडी या राखीव जंगलात कक्ष ३१ मध्ये आग लावताना आरोपी प्रभाष गोपाल मंडल, अशितोष किशोर कोरेत दोघेही रा. अहेरी या दोघांना अटक केली. वनाधिकाऱ्यांनी आरोपींची एमएच-३३-आर-७५२७ क्रमांकाची दुचाकी जप्त केली. सदर कारवाई अहेरीचे वनपरिक्षेत्राधिकारी पी. एस. आत्राम, तानबोडीचे वनरक्षक सांगडे, रामपूरचे वनरक्षक आर. एस. मडावी, दिनाचेरपल्लीचे वनरक्षक पी. एस. घुटे यांच्यासह तानबोडी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आदींनी केली. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींना आग लावताना जंगलात रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील चौकशी वनपरिक्षेत्राधिकारी आत्राम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. यापूर्वीही घोट परिसरात जंगलाला आग लावताना एका आरोपीस अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
आग लावणाऱ्या दोघांना अटक
By admin | Published: April 12, 2017 1:07 AM