लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामे, आॅनलाईन कामे, १३ कोटी वृक्ष लागवडीच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. त्याचबरोबर वन विभागाने दिलेले पीडीए व जीपीएस यंत्र परत केले आहेत.महसूल, पोलीस विभाग व इतर विभागांच्या तुलनेत वनरक्षक, वनपाल यांना कमी वेतन दिले जाते. महसूल विभाग, पोलीस विभाग व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन चवथ्या वेतन आयोगापर्यंत सारखे होते. त्यानंतर मात्र वनकर्मचाऱ्यांच्या वेतनात फार मोठी तफावत पडली आहे. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, यासाठी मागील दहा वर्षांपासून राज्यभरातील वनरक्षक व वनपाल लढा देत आहेत. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्हास्तरावर एक दिवसाचे धरणे आंदोलन सुद्धा केले होते. या आंदोलनाचीही दखल शासनाने घेतली नाही. परिणामी घोट वनपरिक्षेत्रातील वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामे, आॅनलाईन कामे, रोजगार हमी योजनेची कामे, १३ कोटी वृक्ष लागवडीच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. जंगलातील गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी प्रत्येक वनपाल व वनरक्षकाला पीडीए सयंत्र दिले आहे. वनपाल व वनरक्षकांना शासन तांत्रिक कर्मचारी मानण्यास तयार नाही. त्यामुळे तांत्रिक कामांवरही बहिष्कार टाकत पीडीए सयंत्र शासनाला परत केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकाºयांना निवेदन देताना के.पी. अंबादे, एस.डी. गावंडे, एन.व्ही. गंजीवार, डी.एन. सरपाते, पी.आर. शिरपुरकर, के.एस. भांडेकर आदी उपस्थित होते.
तांत्रिक कामांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:44 PM
घोट वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामे, आॅनलाईन कामे, १३ कोटी वृक्ष लागवडीच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. त्याचबरोबर वन विभागाने दिलेले पीडीए व जीपीएस यंत्र परत केले आहेत.
ठळक मुद्देघोटच्या आरएफओंना निवेदन : वनपाल व वनरक्षकांचे असहकार आंदोलन