लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : भूमिगत रेल्वेपुलाने ब्रम्हपुरी- लाखांदूर मार्गाला जोडणाऱ्या त्रिरस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे दररोज अपघात होत आहे. तर या भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला अपघात प्रणवक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र नगरपालिका प्रशासनासोबतच ईतर प्रशासकीय कार्यालय याची दखल घेत नसल्याचे वास्तव चित्र दिसत आहे.
रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. दक्षिणेकडील बाजूस शासकीय कार्यालय, बाजारपेठ असल्यामुळे उत्तरेकडील प्रत्येक नागरिकांना वारंवार ये-जा करावे लागते. तसेच ब्रम्हपुरी -लांखांदूर या मार्ग देखील अतिशय रहदारीचा मार्ग आहे. रेल्वे भूमिगत पुलातून येणारा वाहनधारक सरळ या अतिशय रहदारीच्या ब्रम्हपुरी-लाखांदूर येतो. त्यामुळे दररोज या मार्गावर अपघात होत आहेत. तीच परिस्थिती आरमोरी- कुरखेडा मार्गाची आहे. काही दिवसांपूवी या मार्गावर सिमेंटने भरलेला कप्सूल टँकरचा अपघात झाला. रात्रीच्या वेळी रहदारी नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या दोन्ही मार्गावर अतिक्रमणाचा विळखा बसलेला आहे. मात्र नगरपालिका प्रशासन अतिक्रमण काढण्याच्या मानसिकतेत नाही. यामुळे मात्र भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.