शेकडो ट्रकांची वर्दळ वाढली : घुग्गुसकडे माल नेला जात आहे एटापल्ली : स्थानिकांचा प्रचंड विरोध असतानाही पोलीस बंदोबस्तात एटापल्ली तालुक्यातून सूरजागड पहाडीवरून लोहदगडाची वाहतूक चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्गुसकडे करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर ट्रकांची वर्दळ असल्याने या भागातील रस्ते पूर्णत: उखडून गेले आहे. एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणावर जंगल कापून लोहखनिजाची वाहतूक केली जात आहे. या भागात प्रकल्प निर्माण करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी असताना खासगी कंपनीकडून मनमानी पध्दतीने लोहखनिजाचे उत्खनन केले जात आहे. येथे धर्मकाटा लावून विशिष्ट वजनापर्यंतच ट्रकद्वारे लोहदगडाची वाहतूक करावयाची असताना कुठलेही वजन न करता शेकडो ट्रक दररोज घुग्गुसकडे रवाना करण्यात येत आहे. या भागात लोहखनिज प्रकल्प उभा करण्याला नक्षलवाद्यांचा प्रखर विरोध आहे. पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी यामुळे पोहोचत आहे. ठाकूरदेव यात्रेच्या वेळी शेकडो आदिवासी नागरिक व पर्यावरण प्रेमींनी या संदर्भात निदर्शने केली. त्यानंतरही कंपनीचे काम थांबलेले नाही. ट्रकांच्या वाहतुकीमुळे संपूर्ण एटापल्ली परिसरातील रस्त्यांची वाट लागली आहे. अनेक रस्त्यांवर केवळ माती पसरली असून डांबरी रस्त्यांना खड्डे पडलेले आहे. कंपनीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक आदिवासी संघटना व सुरजागड बचाव संघर्ष समितीने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
लोहदगडाच्या वाहतुकीमुळे रस्ता उखडला
By admin | Published: April 19, 2017 2:10 AM