लाेकमत न्यूज नेटवर्कआरमाेरी : तालुक्यातील सूर्यडोंगरी जंगल परिसरात घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन अवैधरित्या दारू गाळणाऱ्या भट्टीवर किटाळी गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत बुधवारी ८ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केला. तसेच दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. वारंवार कारवाई करूनही परिसरातील काही मुजाेर दारू विक्रेते येथील जंगलात अवैध दारू गाळत असल्याने महिला आक्रमक हाेऊन थेट दारूभट्टीवर धडकल्या.सूर्यडोंगरी येथे अवैध दारू विक्री केली जाते. या गावातूनच परिसरातील किरकोळ अवैध विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. सोबतच परिसरातील किटाळी, आकापूरसह इतर गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी सूर्यडोंगरी येथे येतात. येथील दारूविक्रेत्यांविरोधात पोलिसांनी वारंवार कारवाई करूनही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. सूर्यडोंगरी जंगल परिसरात मोहसडवा टाकून व हातभट्ट्या लावून दारू गाळणे सुरूच ठेवले. याबाबतची माहिती किटाळी गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यानुसार गाव संघटनेच्या महिलांनी सूर्यडोंगरी जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली असता, दोन ठिकाणी मोहसडवा आढळून आला. सदर सडवा नष्ट करण्यात आला.
मरेगावातही दारूविक्री जाेमात; पाेलिसांचे दुर्लक्ष
गडचिराेली तालुक्यातील व आरमाेरी पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मरेगाव व मरेगाव टाेली येथे मागील अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. माेहफुलापासून दारू गाळून विक्री करणे हा येथील काही लाेकांचा तर कुटिराेद्याेगच झाला आहे. काही महिन्यांपूर्वी येथे गावसंघटना गठित करून दारूविक्री बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला; परंतु यश मिळाले नाही. सध्या येथे जाेमात दारूविक्री सुरू आहे. आरमाेरी पाेलिसांचे गावकऱ्यांना सहकार्य मिळत नसल्याने दारूविक्री बंद हाेत नसल्याचे येथील सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.