एसीबीची कारवाई : वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी घेतली लाचवैरागड : कर्मचाऱ्याचे टी.ए. बिल मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून तसेच तक्रारदार कर्मचाऱ्याचे सन २०१५-१६ चे वेतन प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी २०० रूपयाची लाच स्वीकारणाऱ्या महिला कनिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रंगेहाथ अटक केली.किरण प्रदीपराव इंगळे (३७) असे लाच प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून इंगळे या वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहे. सन २०१५ मध्ये कर्मचाऱ्याचे दोन हजार रूपयाचे टी. ए. बिल कनिष्ठ लिपीक इंगळे यांनी मंजूर केले. त्यानंतर सन २०१५-१६ चे वेतन प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी संबंधित कर्मचाऱ्याकडे २०० रूपये लाचेची मागणी केली. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने याबाबतची तक्रार गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी वैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सापळा रचला दरम्यान कनिष्ठ लिपीक किरण इंगळे हिने संबंधित कर्मचाऱ्याकडे २०० रूपयाच्या लाचेची मागणी करून सदर रक्कम स्वीकारली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना इंगळे यांना रंगेहाथ अटक केली. इंगळे यांच्या विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, १३ (१) (ड) सह कलम १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई गडचिरोली एसीबीचे पोलीस निरिक्षक महादेव टेकाम, पोलीस हवालदार विठोबा साखरे व इतर कर्मचाऱ्यांनी केली. (वार्ताहर)
लाचखोर लिपिक महिलेस अटक
By admin | Published: November 09, 2016 2:30 AM