बस बंद झाल्याने अडचण : जारावंडी-कांदळी मार्गावरील पूललोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जारावंडी-कांदळी मार्गावर असलेला पूल बाजुने खचला आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जड वाहन नेणे धोक्याचे झाले आहे. बस विभागाने या पुलामुळेच मागील १० दिवसांपासून बसफेरी बंद केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.जारावंडी ते कांदळीदरम्यान अतिशय जुना पूल आहे. सदर पूल सुस्थितीत असला तरी त्याला लागून असलेले बाजुची भिंत कोसळली आहे. त्यामुळे रस्त्यावरच मोठा खड्डा पडला आहे. पावसाळ्यात नाल्याला पाणी जमा झाल्यानंतर खड्ड्याचा आकार आणखी वाढण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या बाजुलाच खड्डा पडला असल्याने मोठे वाहन नेणे धोकादायक आहे. तरीही काही नागरिक नाइलाजास्तव या पुलावरून ट्रॅक्टर, ट्रक व इतर प्रवासी वाहने नेत असल्याचे दिसून येते. एसटी विभागाने मात्र या खड्ड्यामुळे बंद केले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. मागील दोन वर्षांपासून सदर खड्डा पडला आहे. खड्डा बुजवून पुलाची दुरूस्ती करण्याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
तुटलेल्या पुलामुळे प्रवाशांना धोका
By admin | Published: July 17, 2017 1:01 AM