निवेदन सादर : वर्षभरात केवळ तीनच बैठका पार पडल्यागडचिरोली : बौध्द विवाह व वारसा हक्क कायदा बनविण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. मात्र या समितीच्या बैठका नियमितपणे होत नसल्याने मसूदा निर्मितीच्या कामाला विलंब होत आहे. या समितीच्या बैठका नियमितपणे घेण्यात याव्या, अशी मागणी बहूजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटनच्या वतीने करण्यात आली आहे. बौध्द विवाह व वारसा हक्क कायदा बनविण्यासाठी शासनाने २१ सप्टेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार समिती स्थापन केली. समितीला एक महिन्याच्या आत अंतिम मसुदा सादर करायचा होता. मात्र २१ सप्टेंबर २०१५ पासून आतापर्यंत समितीच्या केवळ तीनच बैठका झाल्या आहेत. मसूदा लेखन उपसमितीचे प्रमुख म्हणून न्यायमूर्ती थूल यांची निवड केली आहे. मात्र ते अतिशय संथगतीने काम करणारे असल्याचे सर्वश्रूत आहे. या समितीच्या बैठका घेऊन मसूदा तयार करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी मेघराज राऊत, सुधीर वालदे, वंदना रायपुरे, के. डी. जनबंधू, नरेंद्र रायपुरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
बौध्द विवाह मसूदा तयार करा
By admin | Published: September 10, 2016 1:15 AM