चामोर्शी : चामोर्शी येथील सर्वे नंबर ९४२ येथे मुस्लीम समाजाचे कब्रस्तान आहे. हे कब्रस्तान ८० ते ९० वर्षांपासून अस्तित्वात असून, येथे जाण्यासाठी मार्ग नसल्याने पावसाळ्यात पायीही चालत जाता येत नसल्याने, मुस्लीम बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या कब्रस्तानकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी मुस्लीम समाज बांधवांनी केली आहे. याबाबत भाजयुमोचे माजी जिल्हा अध्यक्ष स्वप्निल वरघंटे यांच्या नेतृत्वात खासदार अशोक नेते यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, रस्ता नसल्याने दफन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. हे कब्रस्तान चामोर्शीपासून अवघ्या काही अंतरावर असून, येथे खडीकरणाचा रस्ताही नाही, त्यामुळे एक प्रकारे या समाजावर अन्य केल्यासारखं होत असून, या समाजाने लोकप्रतिनिधींकडे कित्येक वर्षांपासून वारंवार मागणी केलेली आहे, परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी सदर समस्येकडे कानाडोळा केला जात आहे.
सदर माहिती भाजयुमोचे माजी जिल्हा अध्यक्ष स्वप्निल वरघंटे यांच्यावर कानावर घातली असता, त्यांनी पुढाकार घेऊन खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदन सादर करण्यासाठी मुस्लीम समाज बांधवांना सोबत घेऊन गेले. खासदार अशाेक यांना सदर समस्या लक्षात आणून दिली. यावेळी लतीफ खान, अयाज शेख, प्रा.नाजिम शेख, शाकीर शेख, जावेद शेख, अफजल खान, हर्षद खान, कामरान खान, नियाजू खान, निहाल शेख आदी उपस्थित होते.