लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील मेंढा येथे बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र सदर बांधकाम अतिशय निकृष्ट आहे. साध्या हातानेही सिमेंट व गिट्टी उकरून काढता येते. यावरून बांधकामाचा दर्जा किती खराब आहे, याचा प्रत्यय येते. विशेष म्हणजे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना ग्रामसेवक व सरपंच हे चुप्पी साधून आहेत. यावरून या बांधकामात या दोघांचाही वाटा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने सिंचन बंधारा मंजूर केला आहे. यासाठी जवळपास १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मागील एक महिन्यापासून बंधाऱ्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर बंधारा अतिशय निकृष्ट दर्जाचा बांधला जात आहे. बंधाºयाचा सध्याचा दर्जा लक्षात घेतला तर यावर पाचही लाख रुपये खर्च होतील की नाही, याबाबत शंका आहे. बंधाऱ्यासाठी नाल्यातीलच मातीमिश्रीत गिट्टी वापरली जात आहे. सिमेंटही वेगळ्याच कंपनीचे वापरले जात आहे. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याने सर्वप्रथम बांधकामाची पाहणी केली. खाली टाकलेले बेडकाँक्रिट साध्या हातानेही उकरून निघत आहे. बांधकामाचा दर्जा एवढा निकृष्ट असल्याने हा बंधारा पावसाळ्यात टिकेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कामावर मेंढा ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांची ट्रॅक्टर व इतर साहित्य वापरले जात आहेत. याचा अर्थ सदर काम उपसरपंचच करीत असावे. फक्त कागदोपत्री ग्रामपंचायत करीत असल्याचे दाखविले जात आहे.उपसरपंचाच्या ट्रॅक्टरने नाल्यातील रेतीचा उपसा करून या रेतीचा वापर बंधाऱ्यासाठी केला जात आहे. रेतीचा उपसा झाल्याने नाल्यामध्ये मोठा खड्डा पडला आहे. याच नाल्यामधून शेतकरी आपल्या शेतात जातात. खड्डा पडल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. हे सर्व निकृष्ट काम ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या मनमर्जीने सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या कामाची चौकशी करून काम थांबविण्यात यावे, अन्यथा हे काम पुढे चालू राहिल्यास शासनाचे सुमारे १५ लाख रुपये वाया जाण्याची शक्यता आहे. तक्रार अर्जावर मेंढा येथील शेतकरी गजानन भुरले, तुळशिदास भैसारे, नीलेश धोडरे, नंदाजी भुरले, सुधीर भुरले, रमेश भुरले, मारोती चलाख यांनी केली आहे.ग्रामसेवक व उपसरपंचाची मिलीभगतसदर कामावर उपसरपंचाचे साहित्य वापरले जात आहेत. यावरून सदर काम उपसरपंचच करीत असल्याचे दिसूून येत आहे. यातील काही मलाई ग्रामसेवकालाही मिळणार असल्याने ग्रामसेवकही चुप्पी साधून आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतरही बांधकाम बंद न ठेवता पुढे रेटले जात आहे. विशेष म्हणजे या बांधकामासाठी चोरीची रेती वापरण्यात आली आहे. ज्या ट्रॅक्टरने रेतीची चोरी झाली आहे, त्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने नियमानुसार १ लाख १३ हजार रुपयांचा दंड ठोठावावा. तसेच जेवढ्या रेतीचा उपसा झाला आहे, तेवढ्या रेतीचे मोजमाप करून तेवढी रक्कम कंत्राटदाराकडून वसूल करावी. तसेच ज्या ठिकाणी खड्डा तयार झाला आहे, सदर खड्डा कंत्राटदारानेच बुजवून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी मेंढा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक छगन खुणे यांना संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी संच बंद असल्याचा शाब्दिक संदेश येत होता.
मेंढात बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:35 AM