आमगाव येथे इटियाडोह पाटबंधारे विभागामार्फत वैनगंगा उपकालवा दक्षिण ते उत्तर वाहिनी ९ कि.मी. अंतरावरून देण्यात आली आहे. सदर वितरिका पूर्णपणे जीर्णावस्थेत असून देखभाल दुरुस्तीअभावी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहाेचत नसल्याने येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. वस्तुस्थिती लक्षात घेता इटियाडोहची नवीन वितरिका एकलपूर कंपार्टमेंट ९७ मधूनच द्यावी, अशी मागणी आमगाव पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष माधव ढोरे यांनी केली आहे.
आमगावातील शेतीची आराजी इतर गावाच्या आराजीपेक्षा जास्त आहे. इटियाडोह पाटबंधारे विभाग वडसाच्या उदासीनतेमुळे आमगाव येथील शेती सिंचनाखाली असूनही पुरून ओलित होऊ शकत नाही. जीर्णावस्थेत असलेली वितरिका जागोजागी फुटत असल्याने अर्धेअधिक पाणी नाल्यात वाहून जाते. संबंधित विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या तेव्हा सदर जागेचे फोटो काढून नेण्यात आले; परंतु दुरुस्ती झाली नाही. प्रस्तावित नहर वनविभाग वडसा-एकलपूर कंपार्टमेंट ९७ मधून वैनगंगा उपकालवा ते कोहमारा रोड आमगाव फाट्याच्या खालून रेल्वे बोगदा जुन्या वितरिकेला जोडल्यास नवीन रेल्वे पूल बांधावे लागणार नाही. हा परिसर झुडपी जंगल असून आरक्षित जागा नसल्याने जंगलाचेही नुकसान होणार नाही.
आ. कृष्णा गजबे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना यापूर्वी निवेदन दिले हाेते. सदर निवेदनाची दखल घेऊन २४ फेब्रुवारी २०२१ ला जलसंपदा विभाग नागपूरचे मुख्य अभियंता यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याबाबत कार्यकारी अभियंता देसाईगंज यांना सूचना देण्यात आल्या होत्या. २६ फेब्रुवारी २०२१ ला प्रस्तावित नहराच्या जागेची पाहणीही करण्यात आली; मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी माधव ढाेरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
बाॅक्स
पाणी नाही तर कर नाही
वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हेतुपुरस्सर सदर बाबीकडे दुर्लक्ष करणे, वेळकाढू धोरण अवलंबणे तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या कामाची दखल न घेणे व प्रकरण प्रलंबित ठेवणे एवढीच कामे पाटबंधारे विभाग देसाईगंज करीत असल्याचा आराेप शेतकऱ्यांकडून हाेत आहे. शेतीसाठी ओलिताची साेय झाली तर शेतकरी स्वखुशीने कर भरेल. मात्र दुर्लक्ष झाल्यास शेतीसाठी पाणी नाही तर करसुद्धा भरणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.