मार्कंडादेव वैनगंगा नदी वळणावरील डोंगरी नैसर्गिकरीत्या एकसंघ व मजबूत होती; परंतु डोंगरीवर झालेल्या अतिउत्खननामुळे डोंगरीची उंची कमी होऊन डोंगरी कमकुवत बनली. डोंगरीवर आदळणाऱ्या वेगवान प्रवाहामुळे उत्तर वाहिनी वळणावरील धोका टाळण्यासाठी शासनाने मार्कंडादेव उत्तर वाहिनी वळणावरील डोंगरीखाली सिमेंट काँक्रिटची मजबूत संरक्षक भिंत बांधावी व डोंगरीवरून कोणासही दगड-गिट्टी उत्खननास तसेच इमारतीच्या बांधकामास पूर्णतः बंदी घालावी, अशी मागणी नागरिकही करीत आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे डाेंगरीला हानी पाेहाेचू नये यासाठी वळणावर मजबूत संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, सेवानिवृत्त बीडीओ तथा राेजगार सेलचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ एस. भडके, प्रभाकर वासेकर, सतीश विधाते, पांडुरंग घोटेकर, वामनराव सावसागडे, देवाजी सोनटक्के, सत्यवान भडके, सी.बी. आवळे, लहूकुमार रामटेके, ललिता भडके, पाैर्णिमा भडके, कल्पना नंदेश्वर, चक्रदास मेश्राम, गोपाल जगन्नाथ यांनी केली आहे.
बाॅक्स
डाेंगरीवर बांधकाम झाले कसे?
विशेष म्हणजे, डोंगरीच्या क्षेत्रातून दगड-गिट्टीचे उत्खनन करणे, मजबूत दगड फोडण्यास ब्लास्टिंग करणे तसेच डोंगरीवर इमारतीचे बांधकाम करण्यास पर्यावरणदृष्ट्या संबंधित विभागाकडून मंजुरी मिळत नाही. असे असतानाही रेगडी दिना धरणाच्या नहर बांधकामाकरिता संबंधित विभागाने १९७३-७४ मध्ये मोठ्या प्रमाणात डोंगरीवर ब्लास्टिंग करून उत्खनन केलेली दगड-गिट्टी नहर बांधकामात वापरली. तसेच विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी सपाट करून तेथे पाॅवर हाउसचे बांधकाम केले आहे. या ठिकाणी बांधकाम झाले कसे,असा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चाैकशी करणे आवश्यक आहे.