आरमोरी तालुक्यातील नवरगाव ते पळसगाव मार्गावर २५ वर्षांपूर्वी नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पूल बांधकामानंतर एकदाही दुरुस्त झाला नाही. त्यामुळे पुलावर जागोजागी खड्डे पडले असून, सळाखी बाहेर निघाल्या आहेत. सोबतच प्रत्येक वर्षी अतिवृष्टीमुळे व पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाशेजारी मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असताना शेतकऱ्यांना येथून ये-जा करण्याकरिता अडचणी येत आहेत. दोन वर्षांपूर्वी याच खड्ड्यात एक शेतकरी पडला होता; मात्र त्याला पोहता येत असल्याने तो सुखरूप बचावला. या मार्गाने महिलादेखील रोवणी व निंदणाची कामे करण्यासाठी जातात. लहान मुलेही येथून ये-जा करीत असतात. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून उपाययाेजना करावी, तसेच येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नवरगाव-पळसगाव मार्गावरील नाल्यावर संरक्षक भिंत बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:26 AM