.
आरमोरी : शहरातील बी. एस. एन. एल. टॉवरजवळील मंदिरासमोर असलेल्या, पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्याच्या जागेवर खासगी व्यक्तीकडून अतिक्रमण होण्याची भीती असून, सदर धोकादायक खड्डा बुजवून त्या जागेवर समाजभवन उभारण्यात यावे, अशी मागणी वाॅर्डातील नागरिकांनी नगराध्यक्ष पवन नारनवरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील बीएसएनएल टॉवर, शेगावच्या पंचकृष्ण मंदिरासमोर खूप मोठा खोल खड्डा आहे. ज्याला जुने गोटे खदान म्हणूनसुद्धा ओळखले जाते. या गोटे खदानमध्ये पावसाचे पाणी साचून खड्डा पाण्याने भरलेला आहे. त्यामुळे परिसरात खेळणारी छोटे मुले व पाळीव जनावरे खड्ड्यामध्ये पडून त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन तो पाण्याने भरलेला खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मागील वर्षी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून केली होती. मात्र याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
आजच्या परिस्थितीत या खड्ड्यावर आपला हक्क गाजविणारे काही बाहेरील नागरिक येरझाऱ्या मारत आहेत. पुढे या जागेवर खासगी व्यक्तींकडून किंवा हक्क गाजविणाऱ्यांकडून बांधकाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक दृष्टीने महत्त्वाचा असलेला पाण्याने भरलेला खड्डा बुजवून त्या ठिकाणी समाजभवन उभारण्यात यावे, अशी मागणी वॉर्डातील नागरिकांनी पुन्हा आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे व नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल खापरे, सूरज पडोळे, रोशन सोनटक्के, शरद भानारकर, चिरंजीव निखारे उपस्थित होते.